
सामना ऑनलाईन । पुणे
शैक्षणिक सुविधांसह रोजगाराच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मूक-बधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर मूक बधिरांचे आंदोलन सुरु होते. या दरम्यान काही तरुणांनी बॅरिकेट्स बाजुला सारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आंदोलन हिंसक वळण घेण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सौम्य लाठीमार करावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी असंवेदशीलतेने लाठीमार केल्याने आंदोलनकर्त्यांनी एका जागी ठाण मांडून बसण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलनकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. आपल्या हक्कांच्या मागण्यांसाठी असे अनेक मोर्चे आपल्याला काढावे लागले आहेत. परंतु, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा शैक्षणिक सुविधांसाठी आम्ही हा मोर्चा काढला होता. आम्ही पुण्यातून मुंबईत जाणार होतो. परंतु, पोलिसांनी त्यालाही नकार दिला. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर इथूनच आम्ही मुंबईच्या दिशेने पायी कूच करू, असा इशारा आंदोलकांनी दिलाय. पोलिसांच्या लाठीमारात तब्बल 12 तरुण जखमी असून त्यातील काही जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.
कर्णबधिरांच्या मोर्चावर लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला हवी. ही घटना सामाजिक न्यायाचे उल्लंघन व वंचितांच्या हक्कांची पायमल्ली करणारी आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राष्ट्रीवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यातील फडणवीस सरकार नसून जनरल डायर सरकार आहे, असे त्या म्हणाल्या.
लोकशाहीमध्ये आपल्या मागण्यांसाठी प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा हक्कही सरकारने हिरावून घेतला आहे. सरकारने 24 तासात निर्णय न घेतल्यास तरुणांसोबत उपोषणला बसेन असा इशाराही त्यांनी दिला आहे.




























































