
सामना प्रतिनिधी । लातूर
पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून पाणी वाचविणे काळाची गरज आहे. यामुळे वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने लातुरात दारोदारी जाऊन पाण्यासाठी अनोख्या पद्धतीने भीक मागण्यात आली. जनतेवर भविष्यात पाण्याची भीक मागण्याची वेळ येऊ नये यासाठी जनजागृती करून पाणी वाचविण्याचे आवाहन करण्यात आले.
लातूर जिल्ह्यात पर्जन्यमान अत्यल्प होत असल्याने सातत्याने दुष्काळ आणि पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी लातूर जिल्ह्यात अनेक गावांत घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. लातूर शहराला 10 दिवसाआड पाणी येत आहे. पाण्याची इतकी भीषण परिस्थिती असताना देखील अनेकजण मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवत आहेत. 10 दिवसाला पाणी येऊनही गटारीत पाणी सोडले जात आहे. पाणी वाचविणे काळाची गरज असून याकडे लक्ष वेधण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने मोती नगर भागात पाण्यासाठी भीक मागण्यात आली. भविष्यात पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ येऊ नये यासाठी या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.






























































