
राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजने अंतर्गत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यापैकी पात्र 10916 सभासदांना 33 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. तर महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यापैकी पात्र 11522 सभासदांना 34 कोटी असे एकूण 22438 सभासदांना 67 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे यांनी दिली आहे.
चालू हंगामात 2020-2021 मध्ये जिल्ह्याच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यात लातूर जिल्हा बँकेस 33 टक्के प्रमाणे पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असून फेब्रुवारी 2021 अखेर बँकेमार्फत 744 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले एकूण उदिष्टाच्या 81 टक्के पूर्तता बॅंकेने केली आहे. उदिष्ट100 टक्के पूर्तता बँकेमार्फत होणार आहे.
शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पतपुरवठा करण्याचा निर्णय राज्यात लातूर जिल्हा बँकेने प्रथमतः घेतला असून त्यानूसार कार्यवाही चालू आहे. शासनामार्फत देखील आमच्या सदर पतपुरवठाचा अभ्यास करून अर्थसंकल्पात अशी सवलत देण्याचा निर्णही घेतलेला आहे अशी माहिती बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी दिली.




























































