मतदानावर बहिष्कार टाकणे म्हणजे राज्यघटनेचा अपमान- लातूर जिल्हाधिकारी

118

सामना प्रतिनिधी, लातूर

आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण मतदानावर बहिष्कार टाकणे म्हणजे राज्यघटनेचा अपमान करणे आहे. अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव येथील ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत आहेत. एक प्रकारे ते ब्लॅकमेलिंगच करीत असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाय योजना करीत आहेत. कांही गावांमधून पिक विम्याच्या कारणावरून तर काही ठिकाणी रस्ते अथवा गावातील विकास कामे रखडल्याच्या कारणांवरून बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला जात आहे. या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचे अनेक मार्ग आहेत. राज्य घटनेने मतदानाचा अधिकार सर्वांना बहाल केला आहे. जे मतदानावर बहिष्कार घालण्याची भाषा करीत आहेत ते राज्यघटनेचा अपमान करीत आहेत, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव येथील कामासाठी पैसे मंजूर झालेले आहेत. आचारसंहितेच्या कारणामुळे काम सुरू करणे शक्य नाही. याची त्यांना महितीही देण्यात आलेली आहे परंतु मतदानावर बहिष्कार घालण्याचा त्यांचा अट्टहास म्हणजे ब्लॅकमेलिंगच आहे, असे श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नागरिकांनी निर्भीडपणे कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतदान करून आपला हक्क बजवावा असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या