
सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या लातूर जिल्ह्यात यावर्षी अतिरिक्त ऊसाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. अतिरीक्त ऊसामुळे कारखाना लवकर ऊस घेऊन जाईना आणि मजूरांकडूनही लूट थांबेना अशा दुहेरी चक्रामध्ये शेतकरी अडकला आहे. या दरम्यान कारखान्याचा सभासद असेल तरच ऊस घेऊन जाऊ असा फतवाच कारखानदारांनी काढलेला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे.
लातूर जिल्हा हा सातत्याने दुष्काळाचे चटके सहन करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. एकीकडे ही स्थिती असताना जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र प्रचंड वाढलेले आहे. यावर्षी तर अतिरीक्त ऊसाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. अनेकांचा ऊस मागील 16-18 महिन्यांपासून फडात उभा आहे. ऊसाला तुरे आलेले आहेत.
साखर कारखान्याच्यावतीने ऊसाची तोड चिठ्ठी दिली तरी मजूर शेतकऱ्याने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ऊस तोडण्यासाठी हातच लावत नाहीत. मजूरांकडून एकरी 7 ते 9 हजार रुपये वसूल केले जात आहेत. ट्रॅक्टरच्या एका ट्रिपला 1 हजार रुपये उकळले जात आहेत. शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या हे निदर्शनास आणून दिल्यावर तडजोड करा अन्यथा ऊस फडातच राहील असे म्हटले जाते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांची बैठक घेऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवली पाहिजे, अशी मागणी अॅड. बळवंत जाधव यांनी केली आहे.






















































