
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांनी सोमवारी शाहिनबी रसुलखान पठाण (वय 36 वर्षे, रा. परळी) या महिलेच्या पोटाची शस्त्रक्रिया केली. अतिशय गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तिच्या पोटातील तब्बल सात किलो वजनाचा मासाचा गोळा काढण्यात आला. स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती शिरसाट-केंद्रे व त्यांच्या टिमने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन या महिलेच्या पोटातील मासाचा गोळा शस्त्रक्रियेव्दारे यशस्वीपणे बाहेर काढला.
शाहिनबी पठाण यांना गेल्या अनेक वर्षापासून पोटदुखीचा त्रास होत होता. सोमवारी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी शाहिनबी पठाण यांची प्राथमिक तपासनी केली असता त्यांच्या पोटात मासाचा गोळा (ओव्हेरिअनसिस्ट) असल्याचे अढळून आले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्या आवश्यक त्या सर्व तपासण्या केल्या असता पोटाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. यानंतर डॉ. सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. क्रांती शिरसाट-केंद्रे यांनी शाहिनबी पठाण यांच्या पोटाची शास्त्रक्रिया करुन त्यांच्या पोटातील अंडाशयावर तयार झालेला सात किलो वजनाचा मासाचा गोळा शस्त्रक्रियेद्वारे वेगळा करुन बाहेर काढला. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. आरती ढोबळे व डॉ. ऋता भिसे यांनी सहाय्य केले. तर भूल तज्ज्ञ म्हणून डॉ. टी. के. कारंडे, डॉ. राजेश कवळास, डॉ. भागवत जाधव व डॉ. संजय बेंबडे यांनी काम पाहिले.


























































