लातूर – उजाड माळरानावर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात

गुढीपाडव्यापासून चैत्राचे कडक उन सुरू झाले असून शेतातील रब्बी हंगामातील कामे पूर्णत्वास आली आहेत. तळपत्या उन्हात वन्यप्राणी उजाड माळरानावर पाण्याच्या शोधात मृगजळाच्या पाठी मागे धावत आहेत. प्रखर उन्हाची तीव्रता वाढत असून आणखी दोन महिने पाण्याच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

मागील वर्षी परतीचा मान्सून मध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने नदी-नाले तलावात पाणी होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या गाई म्हशी बैलांसह इतर वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याचा आधार होता. परंतु एप्रिल महिना सुरू होताच शेत शिवारात कोठेही पाणी उरले नाही. वन्य प्राणी हरीण, काळविटाचे कळप, ससे, कोल्हे, रान डुक्कर, तसेच मोरासह सर्व पक्ष्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प, उटीचा तावजा प्रकल्प, दापेगाव, खुटेगाव येथील साठवण तलावासह लघु व सिंचन तलावात पक्ष्यांचे थवे स्थलांतरित करीत आहेत. वन्य पक्षी पाणथळ जागेत वास्तव्यासाठी येत आहेत. परंतु वन्यप्राण्यांची मात्र पाण्यासाठी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.

औसा तालुक्यात गोंद्री, लोदगा, जावळी, कवळी, हळदुग, टेंभी, बेलकुंड, शिवनी, लामजना, देवताळा अशा अनेक ठिकाणी वनीकरणाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. वन विभागाने वन्यपशू पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे वाढविणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व पशुपक्ष्यांची जोपासना होणे आवश्यक आहे. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात किती तरी मैल मृगजळाच्या मागे धावतात. परंतु त्यांना पाणी मिळत नसल्याने वन्य प्राण्याचे हाल होत आहेत. .

आपली प्रतिक्रिया द्या