लातूर जिल्ह्यातील किनीकदू येथील प्राचीन सतीशिळेचा उलगडा! 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्हयातल्या अहमदपुर तालुक्यातील किनीकदू हे दोनशे उंबऱ्याचे गाव. या गावात एक प्राचीन सतीशिळा आहे. या सतीशिळेच्या शोधामुळे किनीकदू गाव व लातूर जिल्हयाच्या प्राचीन इतिहासात भर पडलेली आहे.

महाराष्ट्र व कर्नाटकात काही गावात आशा सतीशिळा असतात. एखादया लढाईत किंवा अन्य कारणाने गावातला एखादा वीर शहीद झाला किंवा त्यास वीरमरण आल्यास वीरगळ कोरून ठेवत असत तसेच त्या वीर-मरण पावलेल्या वीरासोबत त्याची पत्नी सती गेल्यास ‘सह गमन सतीशिळा’ ठेवली जात असे. बाराव्या शतकानंतर ब्रिटीश काळापर्यंत ही सती प्रथा समाजात होती ब्रिटीशांनी कायदा करून या अनिष्ट प्रथेचा पायबंद केला.

किनीकदू येथे किमान पाचशे वर्षापूर्वीची ही सतीशिळा असून ती सहगमन सतीशिळा आहे. किनीकदूतील एक वीर पुरुष शहीद झाल्यानंतर त्याची पत्नी या वीरासमवेत सती गेल्याचे ते स्मारक प्राचीन शिल्प आहे. ही सतीशिळा तीन टप्यात कोरलेली आहे. खालच्या टप्यात दोघे पती – पत्नी सहगमन करत असल्याचे शिल्प कोरले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्यात वीर स्त्रीचे घोडयावर आरूढ शिल्पाकंन आहे दोन्ही हातात गोल कडे आहेत. या सतीशिळेवर सतीचा हात कोरलेला आहे. तो वर स्वर्गाच्या दिशेने दाखविला असून तिच्या हातात पाच बांगड्यांचा चुडा भरलेला आहे. हेच सतीशिळेचे प्रमुख वैशिष्टय असते. त्यानंतर वीरमरण पावलेल्या पतीचे आणि पत्नीचे स्वर्गात स्वागत करणाऱ्या दोन ‘अप्सरा’ नमस्कार मुद्रेत दाखविलेल्या आहेत व त्याखाली नंदीची प्रतिमा कोरलेली आहे. सर्वात वरच्या शेवटच्या टप्यात कलश स्वर्गस्थळ दाखविले असून त्या बाजुस सूर्य व अर्धचंद्र कोरलेले आहेत. सूर्य व चंद्र असेपर्यंत या दोघाची कीर्ती जगात अजरामर राहील असा त्याचा अर्थ आहे.

अशा या दुर्मीळ प्राचीन ऐतहासिक सहगमन सतीशिळा शिल्पाचा अभ्यास गावचे रहिवासी असलेले प्राच्यविद्याशास्त्राचे अभ्यासक व संशोधक डॉ. भीमराव ब्रम्हाजीराव पाटील यांनी केला आहे आणि त्या प्राचीन सती शिळेवर ऐतिहासिकदृष्टया प्रकाश टाकला आहे गेल्या एका महिन्यात या सतीशिळेचा अभ्यास करून डॉ. भीमराव पाटील यांनी या सतीशिळा शिल्पाचा अर्थ उलगडून दाखविला आहे.

मिरज जिल्हा सांगलीचे इतिहास संशोधक प्रा. मानसिंग कुमठेकर व प्रा. गौतम काटकर तसेच पुण्याचे सतीशिळा संशोधक अनिल दुधाने यांनीही या सहगमन सतीशिळेचा अभ्यास करून ही प्राचीन सहगमन सतीशिळा असल्याचे मत नोंदविले आहे. या संदर्भात कर्मयोगी तुळशीराम महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. आर. डी. गंगथडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या स्थानिक परिसरात मोठया प्रमाणात प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे अवशेष मोठया प्रमाणात विखुरलेले आहेत. त्यांचे जतन व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे आहे असे दै. सामनाशी बोलताना मत व्यक्त केले.