
औसा व लातूर तालुक्यातील गावांमधून बिबट्यांचे दर्शन सध्या नागरिकांना होत आहे. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होत असून मागील एक महिन्यापासून वनविभागाला मात्र बिबट्यांना पकडण्यात यश प्राप्त झालेले नाही. लातूर जिल्ह्यात बिबट्यांचा वावर सध्या दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी औसा तालुक्यातील काही गावांमधून त्याचप्रमाणे लातूर तालुक्यातील गंगापूर पेठ या भागात बिबट्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले होते. वनविभागाच्या वतीने सापळे लावण्यात आले. मात्र या सापळ्यात बिबट्याचे दर्शन झाले नाही. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभळगावातील शेतामध्ये दोन बिबटयांचा वावर आढळून आला. बाभळगाव व पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिक यांना सतर्क करण्यात आले आहे. या संदर्भात वनविभागास कळविण्यात आले असून त्यांनी बिबटयांना पकडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. बिबटयांना पकडे पर्यंत परीसरातील महिला, लहानमुले यांनी घरातच रहावे असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
बाभळगाव येथील देशमुख कुटूंबियांच्या शेतात दोन बिबटे असल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाचे वन अधिकरी पोतलवार यांना तातडीने सुचना देण्यात आल्या आहेत. माहीती मिळताच वनअधिकारी पोतलवार आणि त्यांचे सहकारी बाभळगाव येथे पोहचले असून वनविभागाने बिबटयांना पकडण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली आहे. एक बिबटा पळून गेला आहे तर एक ऊसात लपला आहे त्यांना पकडण्याचे काम सुरू आहे, या बिबटयांना पकडे पर्यंत पंचक्रोशील शेतकरी, नागरिक, महिला आणि लहान मुलांनी शेतात व परीसरात वावरतांना स्वताची काळजी घ्यावी. या दोन बिबटयांना परत वनात सोडल्यानंतर सर्वांना कळविण्यात येईल असेही अमित देशमुख यांनी म्हटले आहे.






























































