लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन 13 ऑगस्टपासून शिथिल करणार – अमित देशमुख

1248

कोरोनाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे. तर 17 ऑगस्टपासून मागे घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेऊन लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनदरम्यान कार्यरत असणाऱ्या यंत्रणांनी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब केला. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.

लॉकडाऊन मागे घेतल्यानंतर 17 ऑगस्टपासून टेस्ट टेस्ट आणि टेस्ट ही कार्यपद्धती स्वीकारण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीत सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. कोविड-19 ही जागतिक आपत्ती आहे. या आपत्तीशी सामना करताना शासन मागे नाही. मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. हात स्वच्छ धुणे, तोंडावर मास्क लावणे त्याचप्रमाणे सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी आपणाला यापुढेही कराव्या लागणार आहेत. लातूर जिल्ह्यात कोविड-19 ला आळा घालण्यासाठी जिल्हा आणि शहरांच्या सीमांवर अधिक दक्षता बाळगण्याचे काम संबंधित यंत्रणा आता करणार आहेत. जिल्ह्यात तसेच शहरात प्रवेश करणाऱ्यांच्या तपासण्या करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल. कोविड -19 नियंत्रणासाठी 1 लाख अँटिजन टेस्ट केल्या जातील, यासाठी खाजगी लॅबचे सहकार्य घेतले जाईल. कोविड-19 उपचारासाठी आता लातूर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी पुढाकार घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोविड -19 चा प्रादुर्भाव इतक्यात संपणार नाही, कदाचित यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल, असा अंदाज सर्वत्र व्यक्त केला जात आहे, हे लक्षात घेतले तर सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. नागरिकांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत अधिक काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन येत्या 13 तारखेपासून शिथिल करण्यात येणार असून 17 ऑगस्टपर्यंत तो मागे घेण्यात येईल. त्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत नवीन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. हे नियम काटेकोरपणे पाळून जिल्हा यंत्रणा आणि शासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या