लातूर ते टेंभुर्णी रस्त्यासंदर्भात मला लाज वाटते – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लातूर ते टेंभुर्णी या रस्त्याच्या संदर्भात आता मलाच लाज वाटतेय, कोणी तरी येऊन घाण करुन जातो पण लवकरच हा रस्ता चौपदरी होईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. मी इतके दिवस ओरडून सांगतोय पण आमदार, खासदार जागे होत नाहीत. पाणी टंचाई हीच जिल्ह्यातील मुख्य समस्या आहे. त्यासाठी जलसंवर्धनावर अधिक काम करा असेही गडकरी यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे विविध विकास कामांच्यां उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील आमदार, खासदार यांची उपस्थिती होती. लातूर ते टेंभुर्णी हा रस्ता अनेक वर्षांपासून होत नाही. अत्यंत खराब रस्ता झाला. रस्ता चौपदरी करण्याचे आश्वासन या पूर्वी गडकरींनी दिले होते पण ते काम काही झाले नाही. आपल्या भाषणात या रस्त्याच्या संदर्भात बोलताना त्यांनी आता मलाच लाज वाटतेय, कोणी तरी येऊन घाण करुन जातो असे म्हणत आता यांची फाईल माझ्यापर्यंत पोहोचली आहे. लवकरात लवकर हा रस्ता चौपदरी होईल असे पुन्हा एकदा अश्वासन देऊन टाकले.

‘पाणी टंचाई हीच लातूर जिल्ह्यातील मोठी समस्या आहे. मी इतके दिवस ओरडून सांगतोय पण आमदार, खासदार जागे होत नाहीत. स्वतः पुढाकार घेऊन जलसंवर्धनावर भर द्या, मी येथील जनतेला, आमदार, खासदार यांना विनंती करतो प्रथम प्राधान्य पाण्याला द्या. जलसंधारण कामाला प्राधान्य द्या. तरच टंचाई निर्माण होणार नाही’ असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.