
लातूर शहरात गावठी पिस्तूलचा पुरवठा वाढला आहे. गावठी पिस्तूलसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही युवक सराईत गुन्हेगार आहेत. मागील चार दिवसातच पोलीसांनी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तीन घटना उघडकीस आणलेल्या आहेत. या घटनाही केवळ गोळी झाडल्याचे उघडकीस आल्यामुळेच समोर आलेला आहेत.
कातपूर रोड येथील मुन्ना टी हाऊस, हाजू नगर येथे दोनजण गावठी पिस्तूल घेऊन मोटारसायकलवर फिरत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक वहिद शेख, कर्मचारी रामचंद्र ढगे, माधव बिलापट्टे, महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, सोमनाथ खडके, यांनी सापळा रचून विश्वनाथ अभिमन्यू देवकते (वय 20, रा. कातपूर ता.जि.लातूर) आणि यशोधन कशवराव कातळे (वय 19, रा.गरसुळी ता. रेणापूर) यांना पकडले.
त्यांच्याजवळून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. सदरील पिस्तूल त्याने पंकज शामसुंदर पारिख याच्याकडून घेतल्याचे सांगितले. विश्वजीत देवकते हा सराईत गुन्हेगार आहे, त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे जबरी चोऱ्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत तर यशोधन कातळे याच्याविरुद्ध दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दोघांवरही विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात रामचंद्र ढगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































