लातूर – विहिरीत पडलेल्या वासरास जीवदान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरातील एसबीएच बँक कॉलनी, केशव नगर भागात कोरड्या विहिरीत पडलेल्या गाईच्या एका लहान वासरास मनपा कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे जीवदान मिळाले. मनपाच्या अग्निशमन विभागास सोमवारी दुपारच्या सुमारास फोनवरून याबाबत माहिती मिळताच फायरमन वाय. जी. खटाळ हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा सदर वासरू जिवंत असल्याचे आढळले. जाळी टाकून रस्सीने वर ओढून घ्यायचे ठरले व लागलीच कर्मचाऱ्यानी आपले प्रयत्न करून अवघ्या अर्ध्या तासात वासराला बाहेर काढून जीवदान देण्यात यश मिळवले. यासाठी अग्निशमन विभागाचे वाय. जी. खटाळ, चंदू जाधव, राधाकिशन कासले, बाळासाहेब जाधव, रवी भोसले, निलेश आचार्य, वाहनचालक पठाण व तेथील स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले.