
नाशिक आता केवळ देशातील बड्या ब्रँडसाठी नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या ब्रँडसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. नाशिकचं वातावरण, इथली धार्मिकता, इथला इतिहास, इथला निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत आहे. ‘स्विस ट्रॅफलगार लक्झरी हॉटेल्स’ (STLH) या यूके मधील लक्झरी हॉटेल्सची साखळी हिंदुस्थानात दाखल झाली असून या समूहातर्फे देशातील पहिले हॉटेल सुरू करण्यासाठी ‘नाशिक’ची निवड करणात आली आहे. अलिशान खोल्या, बँक्वेट, क्लब आणि कॅफेद्वारे इथे येणाऱ्या पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील.
नाशिकमधील स्विस ट्रॅफलगार हे हॉटेल मुंबई आग्रा महामार्गावर पाथर्डी फाटा येथे असून ते लवकरच ग्राहक सेवेत रुजू होत आहे. नाशिक मधील हॉटेलसाठी पहिल्या टप्प्यात 15 कोटीची गुंतवणूक होणार असून अजून दोन मजले बांधून पुढील कालवधीत याचा विस्तार होणार आहे. देशातील पुढील विस्तारासाठी 100 कोटींच्या गुंतवणुकीची योजना देखील आहे.
महिलांसाठी विशेष संकल्पना

स्विस ट्रॅफलगारतर्फे विशेषत: महिलांसाठी एक संकल्पना आणली आहे. यामध्ये खास महिला प्रवाशांना समर्पित असलेला विभाग या हॉटेलमध्ये असणार आहे. या विभागात फक्त महिला कर्मचाऱ्यांकडूनच सेवा दिली जाईल आणि या विभागात कोणत्याही पुरुषांना परवानगी दिली जाणार नाही. या मुळे एकट्याने राहणाऱ्या महिला प्रवाशांना अत्यंत सुरक्षित वातावरण मिळेल. ही अनोखी संकल्पना साकारणारे हे नाशिकमधील पहिले लक्झरी हॉटेल आहे.
सुसज्ज कॅफे

स्विस ट्रॅफलगारने नाशिकमधील रहिवासी आणि स्थानिक लोकांना जागतिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यसाठी येथे एक कॅफे देखील उघडला असून. व्यवस्थापनाने ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच जलद सेवा देण्यासाठी प्रशिक्षित आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित हॉस्पिटॅलिटी संस्थांमधून शेफ्सची नियुक्ती केली आहे. कॅफेमध्ये आशियाई, युरोपियन, दक्षिण आणि उत्तर हिंदुस्थानी पारंपारिक विविध प्रकारचे पदार्थ उपलब्ध असतील. नाशिकमधील पहिलेच थीम-आधारित क्लब देखील येथे सुरू होणार असून शुभारंभ निमित्त अनेक आकर्षक योजना देखील लवकरच आणण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.
































































