माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलाला कोर्टात चपलांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकणारे वकील राकेश किशोर यांना दिल्लीतील न्यायालय परिसरात आज काही वकिलांनी चपलांनी मारहाण केली. ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा ते न्यायालय परिसरात उपस्थित होते. काही वकिलांनी त्यांना धक्काबुक्की केली आणि चपलांनी हल्ला केला. परिस्थिती बिघडू नये म्हणून न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्यांना तातडीने बाहेर नेले.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या वादग्रस्त घटनेत राकेश किशोर यांनी सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान CJI बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही सुरक्षाकर्मचाऱ्यांनी त्यांना त्वरित पकडले होते. मात्र, यानंतरही गवई यांनी त्यांना माफ केले होते. राकेश किशोर यांना या घटनेनंतर बार काऊन्सिलने निलंबित केले आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत त्यांना कायदेशीर प्रकरणांमध्ये कोणतेही काम करता येणार नाही. विरोध आणि टीका होत असूनही राकेश किशोर यांनी त्यांच्या कृतीबद्दल खेद व्यक्त केला नव्हता. उलट, त्यांनी हे करताना “भगवानाने स्वप्नात सांगितले” असा दावा केला होता.

राकेश किशोर हे दिल्ली बार कौन्सिलमध्ये 2009 पासून नोंदणीकृत वरिष्ठ वकील आहेत. त्यांचे वय सुमारे 71–72 वर्षे असल्याचे सांगितले जाते. ही घटना 6 ऑक्टोबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट नंबर 1 मध्ये एका नियमित सुनावणीदरम्यान घडली होती. सुनावणी मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जवारी मंदिरातील भगवान विष्णूची छिन्नविच्छिन्न मूर्ती परत बसवण्याच्या प्रकरणावर चालू होती. सुनावणीदरम्यान सकाळी सुमारे 11:35 वाजता राकेश किशोर यांनी अचानक बूट काढून गवई यांच्याकडे फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित वकील आणि सुरक्षा कर्मचारी यांनी त्यांना तातडीने रोखले. या सर्व घडामोडीमुळे न्यायालय परिसरात तणाव वाढला असून, या प्रकरणावर आता आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.