एसटीचे पहिले वाहक असलेल्या लक्ष्मणराव केवटे यांचं वृद्धापकाळानं निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
laxmanrao-kevate

महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग मंडळाची पहिली एसटी बस नगरच्या माळीवाडा भागातून पुण्यापर्यंत धावली. ती पहिली बस 1 जून 1948 रोजी धावली होती. त्या बसचे पहिले चालक किसन राऊत आणि पहिले वाहक होते लक्ष्मणराव केवटे, हे दोघेही नगर जिल्ह्यातीलच होते. एसटीचे पहिले वाहक असलेल्या लक्ष्मणराव केवटे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 99 वर्षांचे होते. काल रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे

लक्ष्मण केवटे यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नगर-पुणे ही पहिली एसटी सेवा 1948 साली सुरू झाली. त्यावेळेला पहिले वाहक म्हणून त्यांनी काम पाहिले. अतिशय मनमिळावू स्वभाव तसेच कष्ट करण्याची तयारी होती. कुटुंब व्यवस्थेमध्ये आपल्याला नोकरी करावी असे त्यांना शांततेने वाटत होते एसटी महामंडळामध्ये ते रुजू झाले व त्यांना पहिल्यांदीच चालक म्हणून होण्याची संधी मिळाली. एसटी महामंडळामध्ये कार्य करत असताना त्यांनी अनेकांना मोठी मदत केली, ग्रामीण भागातील मुले शिकली पाहिजे या उद्देशाने त्यांनी त्यांच्या कार्याच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले.

वृद्धपकाळाने बुधवारी त्यांची निधन झाले त्यांच्यावर आज नगर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एसटी महामंडळातील अधिकारी तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शहरप्रमुख संभाजी कदम, दत्ता कावरे यांच्यासह सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.