‘गडकरी’ला गळती; 36 कोटींचे नूतनीकरण पाण्यात; रंगायतनमध्ये ‘पाणी थेंब थेंब गळे’ चा प्रयोग

समस्त ठाणेकरांचे सांस्कृतिक वैभव असलेले गडकरी रंगायतन नूतनीकरणानंतर स्वातंत्र्यदिनापासून नव्या ढंगात सुरू झाले खरे. पण उद्घाटनानंतर अवघ्या महिनाभरातच त्याला गळती लागली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गडकरीमध्ये जणू ‘पाणी थेंब थेंब गळे’चा प्रयोग सुरू झाला असून कलाकार, नाट्यप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. ३६ कोटी रुपयांचे हे नूतनीकरण पाण्यात गेल्याने पैसे नेमके मुरले कुठे, असा सवाल विचारण्यात येत आहे.

राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाचे २६ वर्षानंतर नूतनीकरण करण्यात आले. या कामाला ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली. गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम यापूर्वदिखील अनेकवेळा करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या वतीने लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. तिसऱ्यांदा नूतनीकरणासाठी २३ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर १३ कोटींचा वाढीव खर्च करण्याची तयारीदेखील पालिकेने दर्शवली होती. त्यानुसार शासनाकडून निधीदेखील उपलब्ध झाला. यामध्ये रंगमंच, आसन व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रंगपट, स्टेजच्या मागची बाजू, स्वच्छतागृहे आणि छताचे काम करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला.

वादाची मालिका संपता संपेना…
उद्घाटनावेळी रंगायतनच्या नाट्यगृहातून बाहेर पडताना दरवाजाजवळ हिंदीत ‘निकास’ या शब्दाची पाटी लावण्यात आली होती. त्यामुळे ठाणेकर रसिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. नंतर शब्दाची पाटी बदलाची वेळ पालिका प्रशासनावर आली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेली ऐतिहासिक अशी कोनशिला अडगळीत पडलेली आहे. शिवसेनाप्रमुखांचे नाव असलेली पाटी दिसत नसल्याने ठाणेकरांनी संताप व्यक्त केला आहे.
याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी सवाल उपस्थित केला होता. ही कोनशिला दर्शनी भागात बसवण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र अद्याप कोनशिला अडगळीत पडली आहे.

खुर्च्याची संख्याही कमी केली
नूतनीकरणानंतर जवळपास २१० खुर्च्या कमी करण्यात आल्या आहेत. पूर्वी याच खुच्र्यांची क्षमता १ हजार ५६ इतकी होती. ती आता केवळ ८४६ इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नाटक पाहायला येणाऱ्या नाट्यरसिकांचा हिरमोड होत आहे. दुसऱ्या रांगेतील डावीकडील दोन खुच्र्यांना नाटकातील पात्रांचा अभिनय दिसू शकत नसल्यामुळे प्रेक्षकांचा रसभंग होत असून नाट्य निर्मात्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.