
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिंदुस्थान-चीन सीमेवर बिलासपूर-मनाली-लेह मार्गावर रेल्वे बांधत असलेल्या जगातल्या सर्वात उंच रेल्वे मार्गावर प्रवाशांना ऑक्सिजनअभावी श्वास घेण्यास कोणताही त्रास होऊ नये यासाठी विमानाप्रमाणे ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रण करणारे रेल्वेचे डबे तयार करण्यात येणार आहेत.
समुद्रसपाटीपासून तब्बल 5,360 मीटर उंचीवर 83,360 कोटी रुपये खर्च करून 465 किलोमीटरचा विलासपूर-मनाली-लेह रेल्वे मार्ग बांधला जात आहे. त्यावेळी विमानात ज्याप्रमाणे ऑक्सिजनचे प्रमाण राखले जाणारी यंत्रणा कार्यरत असते. तशा प्रकारचे तंत्रज्ञान आता रेल्वे येथे प्रवाशांना ऑन बोर्ड ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी वापरणार आहे. सध्या रेल्वेचे पहिले अशा प्रकारचे विमानाप्रमाणे प्रेशराइज्ड कोच तंत्रज्ञान चीनच्या क्विनघाय-तिबेट रेल्वे मार्गावर वापरले जात आहे. चीनमधील हे डबे कॅनडाच्या बम्बार्डिअर इंक या कंपनीने तयार केले असून ही कंपनी छोटी विमानेही बनविते. लेह मार्गासाठीचे डबे परदेशातून आणणार की देशातच तयार करणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. हा रेल्वे मार्ग एकदा तयार झाला की बिलासपूर आणि लेहदरम्यानच्या सुंदेरनगर, मंडी, मनाली, केलाँग, कोकसर, दरचा, उप्सी, करू आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरच्या इतर महत्त्वाच्या शहरांना हा मार्ग एकत्र जोडणार आहे.
प्रवाशांना विमानात जास्त उंचीवर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वसनाचा त्रास होत असतो. त्यावेळी ऑक्सिजनचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी प्रेशराइज्ड केबिन विमानात वापरली जात असते, असे उत्तर रेल्वेचे मुख्य अभियंते (बांधकाम) डी. आर. गुप्ता यांनी दिले.


























































