
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील ‘सहयोग’ निवासस्थानासमोर आज सकाळी एका अघोरी पूजेचा आणि भानामतीचा प्रकार आढळून आला. सोसायटीच्या मुख्य गेटजवळ जमिनीवर लिंबू, मिरची, काळे कापड, काही पूजेचे साहित्य आणि उतारा आढळला. हा प्रकार सकाळी सहयोग सोसायटीतील रहिवाशांना दिसला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. हा प्रकार कुणाच्या विरोधात कट रचण्यासाठी किंवा निवडणुकीत कुणाचे तिकीट कापण्यासाठी केला असावा. तर काहींना वाटते की, कुणाचे तिकीट पक्के करण्यासाठी असा प्रकार केला गेला असावा. पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. बारामतीत अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.




























































