बिबट्याचा बछडा आता शिवसेनेच्या कुटुंबात येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येऊरमध्ये आईपासून ताटातूट झालेल्या बिबट्याचा बछडा आता शिवसेनेच्या कुटुंबात दाखल होणार आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक या बछड्याला दत्तक योजनेंतर्गत दत्तक घेणार आहेत. त्याची आई न परतल्याने बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गेस्ट हाऊसमध्ये सध्या पिल्लाची बडदास्त सुरू आहे. आता सरनाईक कुटुंबीयच त्याला दत्तक घेत उद्यानातील त्याच्या खर्चाचा भार उचलून त्याच्यावर मायेची पाखर घालणार आहे. त्यामुळे पिल्लाच्या कोडकौतुकासह त्याच्या दिमतीला संपूर्ण कुटुंब आता सज्ज राहणार असल्याने त्याच्या मनातील एकटेपणाची भावनाही दूर होणार आहे.

येऊरच्या एअरफोर्स स्टेशन परिसरात 4 डिसेंबर रोजी सापडलेल्या बिबट्याचा आईसोबत पुनर्भेट घडवण्यासाठी वनविभागाने जंग जंग पछाडले. मात्र आईने पिल्लाकडे पाठ फिरवल्याने त्याची उद्यानाच्या गेस्ट हाऊसमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांच्या टीमने उत्तम शुश्रूषा केली. त्यामुळे पिल्लाच्या वजनात एक किलोपर्यंत वाढ झाली. त्याचवेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्या ओवळा- माजिवडा मतदारसंघातील येऊर परिसरात हा बछडा सापडल्याने त्यांचे त्याच्या तब्येतीकडे बारीक लक्ष होते. अखेर त्यांनी त्याच्या आयुष्यभराचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला असून दत्तक योजनेंतर्गत सरनाईक कुटुंब या पिल्लाला शनिवार, 28 डिसेंबर रोजी दत्तक घेणार आहेत. उद्यानात वनविभागाचे कर्मचारी त्याचे संगोपन करणार आहेत. उद्यानातील वाघ तेजस ठाकरे यांनी दत्तक घेतला होता. सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले व माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी दत्तक योजनेत बिबट्याचा दत्तक घेतला आहे.

नामकरणविधीही होणार
तीन आठवड्यापासुन उद्यानाच्या गेस्ट हाऊसमध्ये राहणाऱ्या या पिल्लाचे अद्याप नामकरण करण्यात आलेले नसून सरनाई
कुटुंबीयांनी त्याला दत्तक घेताच त्याच्या नामकरणाचा विधीही पूर्ण होणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले

वाढदिवसाची अनोखी भेट
युवासेना सचिव, नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांचा 28 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून पिल्लाला दत्तक घेतले जात आहे. माझ्या आयुष्यभरातील सर्व वाढदिवसांमधील ही सर्वाधिक अविस्मरणीय भेट असून वडिलांची पिल्लाच्या आयुष्यभराच्या संगोपनाची ही जबाबदारी माझ्यावर सोपवल्याने मी कृतकृत्य झाल्याचे पूर्वेश यांनी सांगितले.