
सामना ऑनलाईन । वाशिम
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी येथे पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या एका शेतातील विहिरीत पडला होता. रविवारी सकाळी येथील शेतकऱ्याला बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात येताच त्याने याबाबतची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तीन तास अथक प्रयत्न करून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. विहिरीत पडल्यामुळे बिबट्याला अशक्तपणा आलाल्याने त्याला उपचारासाठी अकोला येथील प्राणी निरिक्षण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
कमी पर्जन्यमानामुळे वाशिम जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईची झळ वन्य प्राण्यांनाही बसत आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीकडे येत आहेत. अशावेळी हिंस्र प्राण्यांचे नागरिकांवर हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्णाण झाले आहे.


























































