
भक्ष्याच्या पाठलागावर असणारा एक बिबट्या विहिराचा अंदाज न आल्याने विहिरीत पडल्याची घटना मसुरे भोगलेवाडी येथे मध्यरात्री घडली आहे. येथील सुदेश रावराणे यांच्या कुत्र्याचा पाठलाग करत असताना हा बिबट्या 20 ते 25 फूट खोल विहिरीत कोसळला. वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यात बंद केले.
रावराणे यांच्या कुत्र्याच्या मागावर सदर बिबटा वस्तीत आला होता. कुत्र्यांच्या जोरदार भुंकण्यामुळे राणे यांना शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास जाग आली. घराबाहेरील लाईट चालू करताच सदर बिबट्याने धूम ठोकली होती. काही वेळातच पुन्हा कुत्र्यांचा आवाज आल्याने ग्रामस्थांनी कानोसा घेतला असता लगतच्या गजानन भोगले यांच्या सुमारे वीस फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसून आले.
ग्रामस्थांची पोलीस पाटील विलास सावंत याना संपर्क साधत वनविभागालाही माहित दिली. विहिरीत असलेल्या पंपाच्या पाईपला पकडून सदर बिबटा कसाबसा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता.
शनिवारी सकाळी 7.30च्या सुमारास मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक सारीक फकीर, गुरुनाथ आचरेकर, चेतन मयेकर यानि विहीरीत पिंजरा सोडत ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरी बाहेर काढले.
पशुवैधकीय अधिकारी डॉ वेर्लेकर यांनी आरोग्य तपासणी केली. वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.


























































