
मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावाजवळ बिबट्याची मादी ऊसाच्या शेतात विश्रांती घेत होती. तिच्यासोबत तिचे दोन बछडेही होते. अचानक शेतामध्ये माणसं आली, ज्यांची चाहूल लागल्याने मादी पळून गेली. तिचे बछडे मात्र वेगाने धावता येत नसल्याने तिथेच राहिले. हे बछडे पाहून शेतकरी घाबरले होते. त्यांनी तत्काळ वनविभागाला याबाबतची कल्पना दिली. ही घटना 26 मार्चला घडली होती. 27 मार्चच्या संध्याकाळी प्राणीमित्र आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मादी आणि बछड्यांची भेट घडवून आणली.
बछड्यांबाबतची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवलं. त्यांच्यासोबत प्राणीमित्र अनिल खैरे हे देखील शेतात पोहोचले होते. सहाय्यक वनसंरक्षक संजय मारणे, तज्ज्ञ जीवशास्त्रज्ञ, बचाव सदस्य आणि पशुवैद्यकीय सर्जन हे देखील शेतात आले होते. त्यांनी बछड्यांची तपासणी केली, दोन्ही बछडे व्यवस्थित होते आणि त्यांना कोणतीही इजा झालेली नव्हती. दोन्ही बछडे मादी असून निरोगी असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांची मातेशी परत भेट घडवून आणायचं ठरलं. पुण्याच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी यांच्या अभिप्रायाने ही कामगिरी करण्याचं ठरलं. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी शेतामध्ये कॅमेरा सापळा लावला आणि बछड्यांना तिथे आणून ठेवलं. मध्यरात्रीच्या सुमारास मादी बिबट्या तिथे आला आणि आपल्या पिल्लांना घेऊन गेल्याचं कॅमेऱ्यात दिसून आलं. यामुळे ताटातूट झालेल्या मायलेकरांची भेट घडविण्यात आम्हाला यश आल्याचे प्राणीमित्र खैरे यांनी सांगितले.



























































