
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
तालुक्यातील मोहरी गावातील डोईफोडी वस्ती लगत असलेल्या गोसावी वस्ती जवळील चिरदऱ्यात बिबट्याच्या वावराने घबराट पसरली आहे. शुक्रवारी सकाळी 111 वाजता चिरदरा परिसरात अर्जुन बन व गोरक्ष बन हे दोघे भाऊ जनावरे चारण्यासाठी गेले होते तेव्हा बिबट्याने जनावरांचा पाठलाग सुरु केला. जनावरे बनवस्तीकडे पळाले. बन बंधुंनी फोनवरून वस्तीवर त्यांच्या मित्रांना बिबट्या आल्याचे कळविले त्यानंतर नागरीक धावले. चिरदऱ्यात बिबट्या दबा धरून बसला होता. काही वेळानंतर ग्रामस्थांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला.
संजय बन ,गोरक्ष बन यांच्या गेल्या दोन महिन्यापूर्वी बिबट्या हल्यात एक गाय आणि चार शेळ्या ठार झाल्या होत्या. या भागात सातत्याने बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकार्यांना याबाबत कळविले असून वनसेवक अशोक मरकड ,बाळू मरकड यांनी गोसावी वस्तीला भेट दिली.
बिबट्या पाण्याच्या शोधात तो लोक वस्तीकडे येत आहे. नागरीकांनी सावध रहावे डोंगराळ भाग असल्याने दरवर्षी बिबट्याचा या भागात वावर असतो असे वनसेवक अशोक मरकड म्हणाले. ग्रामपंचायतीच्या लेखीपत्र दिल्यानंतर येथे लवकरच पिंजरा लावला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले.






























































