बिब्बट आई व पिल्लाचे झाले पुनर्मिलन, वनविभागाच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणू संसर्गाचे वातावरण तापत असतानाच आपल्या आईपासून दूर झालेल्या बिबट्याच्या पिल्लाला त्याच्या आईची भेट घालून देण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व वन्यजीव रक्षकांना यश मिळाले आहे. त्या दोघांच्याही भेटीने वनविभागाची टिम देखील आनंदी झाली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कुटुंबिय एकत्र असताना प्राण्यांमध्ये देखील ही अगतिका असायला हवी. एकीकडे किनवटच्या जंगलात दोन बिबट्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर वनविभाग हादरला होता. त्या प्रकरणाची चौकशी उच्चस्तरावरुन सुरू आहे. हा सर्व प्रकार सुरु असताना नांदेड तालुक्यातील भोसी परिसरात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्वारीची कापणी चालू असताना बिबट्याचे पिल्लू आढळले. त्यामुळे सदरचा शेतकरी घाबरला आणि त्याने वनविभागाला कळविले. आपल्या आईपासून दूर असलेल्या या बिबट्याच्या पिल्लाचे ओरडणेही सुरू होते. आपण आपल्या जवळ कधी जाऊ याची ओढच त्याला लागली होती. सदरचा परिसर जंगलालाच लागून असून, याच परिसरात ऊस व केळी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. ही सर्व पार्श्वभूमीवर वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, वनसंरक्षक बी.एस.पवार व वन्यजीव रक्षक अतिंद्र कट्टी, प्रसाद शिंदे यांनी त्या पिल्लाच्या आईचा शोध घेण्यास प्रारंभ केला.

वास्तविक वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मधील निर्देशाप्रमाणे तसेच मादी बिबट व तिच्या पिलाची ताटातुट झाली तर पिल्लाच्या जिवंत राहण्याची शक्यता खूप कमी प्रमाणात असते. समजा ते पिल्लू जगले तरी त्याचे पूर्ण आयुष्य बंदीवासात पिंजऱ्यात गेले असते व पिलाची ताटातुट झाल्यामुळे मादी बिबट आक्रमक होण्याची शक्यता होती. या सर्व बाबींचा वन्यजीव रक्षक आणि अधिकाऱ्यांनी अभ्यास केला. गेली दोन दिवस सदरचा परिसर निर्मनुष्य करुन त्याठिकाणी टेहळणी पथक गोपनियरित्या नेमले. बिबट्याच्या पिल्लाला मोकळे सोडून परिसरात असलेल्या तिच्या आईची वाट पाहत हे पथक बसले. आईला दाद घालण्यात येणारी साद तसेच पिल्लाचे ओरडणे व वातावरण निर्मिती या सर्व प्रयोगांचा वापर करत अखेर मादी बिबट आपल्या पिल्लापाशी आले. दोन दिवसाच्या अथक परिश्रमानंतर वनविभागाला माता व पिल्लाची पुर्नभेट करुन देण्यात यश आले. या दोघांचेही आंतरीक प्रेम व ताटातुट झालेल्या आई व बाळाची भेट व त्यांचे मातृत्व याचाही अनुभव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेवून आपण त्यासाठी थोडा फार का होईना हातभार उचलल्याचे समाधान या कर्मचारी वर्गात होते. वनमित्र अतिंद्र कट्टी यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, हे काम अत्यंत जोखीमेचे असते, अशा प्रकारच्या घटना वनविभागात दुर्मिळ समजल्या जातात. नांदेड वनविभागाच्या अधिकारी व वनमित्रांच्या परिश्रमानंतर हे शक्य होऊ शकले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.