
नगर जिल्ह्याच्या बहुतांशी तालुक्यांमध्ये बिबट्याची दहशत वाढलेली असतानाच आता बिबट्याने नगर शहराच्या सीमेवर धडक मारली आहे. नगर शहराजवळ असलेल्या विजयनगर बायपास परिसरातील लांडेवस्तीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
नगर जिह्यातील पारनेर, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, अकोलेसह बहुतांशी तालुक्यांमध्ये आजवर बिबट्याचा वावर आढळून आला आहे. अकोले, पाथर्डी तालुक्यांमध्ये तर बिबट्याने मनुष्यावर हल्ला केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. आजवर वन विभागाने अनेक ठिकाणी बिबटय़ांना जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.
नगर शहरापासून जवळच असलेल्या लांडेवस्ती या ठिकाणी मागील आठवडय़ात बिबट्या दिसला होता. त्यावेळी वन विभागाने पिंजरा लावला होता. मात्र, त्यावेळी बिबट्या पिंजऱयात अडकला नव्हता.
काल पुन्हा एकदा शेतात काम करणाऱया शेतकऱयांना बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे त्यांची पळापळ झाली. याची माहिती नगरसेवक श्याम नळकांडे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. शहरानजीक बिबट्या आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

























































