
पुण्यामध्ये सध्या बिबट्याची जोरदार चर्चा आहे. नरभक्षक बिबट्याने शिरूर तालुक्यात हैदोस घातला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व जांबुत येथे सलग 20 दिवसात तीन जणांवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले. बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी पुणे-नाशिक महामार्ग नागिरकांनी 16 तास रोखून धरला होता. याची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून बिबट्यांच्या नसबंदीचा कार्यक्रम आणि स्थलांतरासंदर्भात विचार सुरू असल्याचे ते म्हणाले आहेत.
मुंबईमध्ये प्रसारमांध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पुण्यात बिबट्याच्या हल्ल्यात झालेली जीविताहनीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या भागामध्ये बिबट्याच्या माध्यमातून खूप घटना घडत आहेत. पुणे जिल्हा आणि लगतच्या नगर जिल्ह्यात एकूण 1300 बिबटे असल्याचा अंदाज आहे. याबाबत केंद्र सरकारशी आम्ही चर्चा करत आहे. केंद्रीय वन मंत्र्यांसोबत याबाबत चर्चा करू, मंत्रालयातील आजच्या बैठकीला दिलीप वळसे पाटीलही आले होते. आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत. तसेच काही प्रमाणात बिबट्यांना पकडून रेस्क्यू सेंटरमध्ये देण्याची परवानगी देण्यात यावी, नसबंदीच्या कार्यक्रमसाठी केंद्र सरकारने आम्हाला परवानगी द्यावी. आवश्यकता असेल तर नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राकडे केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्याने ग्रामस्थ संतप्त, पुणे-नाशिक महामार्गावर केला रास्ता रोको
            
		





































    
    























