लेप्टोविरोधात पालिकेची धडक कारवाई, 1 लाख 15 हजार 518 उंदरांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्राण्यांच्या मलमुत्रापासून पसरणाऱया लेप्टोविरोधात मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 1 लाख 15 हजार 518 उंदरांचा खात्मा करण्यात आला आहे. लेप्टोविरोधात 1 जानेवारी ते 25 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवली गेली.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत असतानाच पावसाळी आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे दुहेरी आव्हानही पालिका यशस्वीपणे हाताळत आहे. लेप्टो, मलेरिया, एच-वन एन-वन, गॅस्ट्रो, हेपटायसिस आणि डेंग्यू यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा कीटकनाशक विभागही सरसावला आहे. साचलेल्या पाण्यात उंदीर, गायी, म्हशी, घोडे, कुत्रे आणि मांजर यांचे मलमूत्र असल्यास आणि त्याचा संपर्क जखम असलेल्या व्यक्तीबरोबर आल्यास अशा व्यक्तीला लेप्टोचा संसर्ग होतो.

आठ विभागांत मलेरियात वाढ
इतर पावसाळी आजारांमध्ये येणाऱया मलेरियामध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे. पालिकेच्या ए, बी, सी, डी, एफ/दक्षिण, एफ/उत्तर, जी/दक्षिण आणि जी/उत्तर विभागांत मलेरियाचे प्रमाण किंचित वाढले आहे. त्यामुळे या विभागांमध्ये कीटकनाशक विभागांमार्फत मोठय़ा प्रमाणात मलेरियाविरोधात शोधमोहीम सुरू आहे. पालिकेकडून धूरफवारणी तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. घर, इमारतीची गच्ची, टाक्या तसेच आजूबाजूला पाणी साचणार नाही, याची काळजी लोकांनी घ्यावी, अशी सूचना पालिकेने केली आहे. 18 ऑगस्टपर्यंत मुंबईत मलेरियाचे 592 रुग्ण सापडले होते तर दोघा जणांचा मृत्यू झाला होता.

लेप्टोविरोधातील मोहीम अशी चालते
लेप्टोचा प्रसार रोखण्यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हणजे मार्च ते एप्रिलपर्यंत विशेष मोहीम सुरू केली जाते. साचलेल्या पाण्यात लेप्टोचा प्रसार होत असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची जी जी ठिकाणे असतात त्या ठिकाणी विशेष मोहीम राबवली जाते. उंदरांना हाताने मारण्याबरोबरच ऍल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्या टाकून मारले जाते. पावसाळ्याआधी प्रत्येक ठिकाणी तीन ते चार वेळा ही मोहीम राबवली जाते. पावसाळ्यात ही मोहीम बंद असते. मात्र, ज्यावेळी दोन ते चार दिवस पाऊस पडत नाही, त्यावेळी पुन्हा गोळ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला लेप्टो झाला आहे, अशा व्यक्तीला उंदिर पकडण्यासाठी पालिकेच्यावतीने पिंजरा दिला जातो, अशी माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली. आतापर्यंत लेप्टोचे 16 रुग्ण सापडले आहेत.