पाकिस्तानचा आणखी एक आत्मघाती निर्णय; हिंदुस्थानातील टपालांवर बंदी

1184

हिंदुस्थानने जम्मू कश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानातील व्यापार थांबवला होता. तसेच त्यांच्या हवाई क्षेत्रात हिंदुस्थानी विमानांना बंदी करण्यात आली होती. या दोन निर्णयांचा हिंदुस्थानवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र, पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसला होता. आता पाकिस्तानने आणखी एक आत्मघाती निर्णय घेतला आहे. त्यांनी हिंदुस्थानातील टपालांना पाकिस्तानात बंदी घातली आहे. गेल्या 70 वर्षांत पहिल्यांदा पाकिस्तानकडून असे पाऊल उचलण्यात आले आहे.

पाकिस्तानने 27 ऑगस्टपासून हिंदुस्थानातील कोणतेही टपाल स्वीकारलेले नाही, अशी माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. हिंदुस्थानला याबाबतची कोणतीही पूर्वकल्पना न देता पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय टपाल युनियन कायद्याचा भंग झाल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय टपाल युनियन यंत्रणेकडून अशी टपाले पाठवण्यात येतात. पाकिस्तानने दोन महिन्यांपासून टपाल स्वीकारण्यास नकार दिल्याने हिंदुस्थानी अधिकाऱ्यांनीही पाकिस्तानात जाणारी टपाले थांबवली आहेत.

याआधी दोन्ही देशांमध्ये झालेली युद्धे, बांगलादेशचे विभाजन आणि सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवरही असा निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानचा हा निर्णय अनावश्यक असल्याचे मानले जात आहे. मात्र, पाकिस्तानच्या या निर्णयाचा हिंदुस्थानवर फारसा प्रभाव पडणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र, हिंदुस्थानातील काही नागरिक पाकिस्तानातील काही नातलगांना सणांच्या काळात टपाल किंवा भेटकार्ड पाठवतात, त्यावर याचा परिणाम होणार आहे. तर पाकिस्तानातून येणारे सर्वाधिक टपाल हे पंजाब आणि जम्मू कश्मीरमधील असतात. त्यात अभ्यास साहित्याशी संबंधित वस्तूंचा समावेश असतो. तसेच दोन्ही देशांत व्हिसाशी संबंधित कागदपत्रांचा व्यवहार टपालाच्या माध्यमातून होतो. हिंदुस्थानात एकूण 28 आंतरराष्ट्रीय टपाल कार्यालये आहेत. त्यात परदेशी टपाले येतात. त्यापेकी फक्त दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांनाच पाकिस्तानात टपाल पाठवण्याचा आणि तेथील टपाल स्वीकारण्याचा अधिकार आहे. सध्या पाकिस्तानातून पाठवण्यात येणारे टपाल सौदी अरबच्या विमानसेवेद्वारे हिंदुस्थानात येत आहेत. त्यामुळे आधीच्या निर्णयांप्रमाणे हा निर्णयही पाकिस्तानसाठी आत्मघाती ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्य़क्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या