
सामना प्रतिनिधी, मुंबई
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या तिकिटातून प्रत्येकी एक रुपया कापून राबविलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजने’तून आतापर्यंत १३० कोटी रुपयांची अपघात नुकसानभरपाई देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेतील २६० कोटी रुपये महामंडळाकडे शिल्लक आहेत. या योजनेपूर्वी अपघातातील नुकसानभरपाई ही एसटीच्या महसुलातून दिली जायची, परंतु आता प्रवाशांना एक रुपया अधिभार लावल्याने महामंडळाची घसघशीत बचत होत आहे.
एसटी महामंडळात अपघाताचे प्रमाण कमी असले तरी पूर्वी दिली जाणारी नुकसानभरपाई अतिशय तुटपुंजी होती. पूर्वी अपघातात मृत्यू आल्यास तीन लाख रुपये आर्थिक मदत मिळायची आणि आता दहा लाखांची मदत मिळते. परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून २०१६ पासून ही योजना राबविण्यास सुरुवात झाली.
एसटीचे अपघाती मृत्यू
साल प्रवासी इतर कर्मचारी एकूण
२०१६-१७ ६५ ३६८ १२ ४४५
२०१७-१८ ३८ ३७५ ११ ४२४
एसटीच्या अपघातात एसटीचा वाहक व चालक मृत्यू पावल्यास त्यांनाही अपघात सहायता योजनेच्या कक्षेत आणल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना इतर देण्यांबरोबर दहा लाख स्वतंत्र भरपाई मिळते. पूर्वी अपघात सहायता निधीत वर्षाला सरासरी ४६ ते ४७ कोटी रुपये मदत वाटली जायची, परंतु २०१६-१७ मध्ये ८० कोटींची मदत करण्यात आली. आतापर्यंत १३० कोटी रक्कम वाटली असून २६० कोटी रुपये महामंडळाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. शंभर टक्के प्रवासी सवलत मिळत असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून एक रुपयाही न घेता दहा लाखांच्या अपघात सहायता विमा योजनेचे संरक्षण मिळत आहे.



























































