मद्याचा ट्रक झाला पलटी, तळीरामांसाठी दिवस झाला सुपर संडे!

प्रसाद नायगावकर, यवतमाळ

रविवारी यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तुळजापूर महामार्गावर नांदगव्हाण घाटात मद्याचे बॉक्स घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही, पण नांदगव्हाण घाट परिसरातील तळीरामांसाठी हा ट्रक उलटल्याने तो दिवस हा ‘सुपर संडे’ ठरला.

बारामतीकडून यवतमाळकडे जाणारा ट्रक उमरखेड महागांव दरम्यान असलेल्या नांदगव्हाण घाटात अपघातग्रस्त झाला अचानक घाटात ब्रेक फेल झाल्यानंतर दुसऱ्या गाडीला वाचवण्यासाठी ट्रक ड्रायव्हरने बाजूच्या असलेल्या दगडाच्या कठड्यास धडक देऊन ट्रक क्षतीग्रस्त झाला. या ट्रकमध्ये विदेशी कंपनीचे मद्य होते. मद्याचे बॉक्स हे रस्त्यावर अपघातामुळे पडून होते. मग काय आजूबाजूच्या परिसरातील तळीरामांनी जमेल तसे बाटल्या आणि मद्याचे बॉक्स लंपास केले. त्यामुळे परिसरातील मद्यपींसाठी हा रविवार ‘सुपर संडे’ ठरला. याचमुळे हा अपघात परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे .

अपघाताची माहिती मिळाल्यावर लगेच वाहतूक पोलीस यंत्रणा आणि पोलीस स्टेशन महागावचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यामुळे बाकीचा माल वाचला. महागाव पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल विनायक चव्हाण पंचनामा करण्यासाठी घटना स्थळी हजर झाले. या संदर्भात पुढील तपास पोलीस स्टेशन महागाव करीत आहे.