जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघातील पॅट कमिन्स, ट्रव्हिस हेड, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, स्टीव्हन स्मिथ, जोश इंगलिस आणि सीन एबॉटसह 25 खेळाडूंना आयपीएलच्या लिलावासाठी दोन कोटींची सर्वोत्तम मूळ किंमत लाभली आहे. त्यामुळे आयपीएलचा लिलावात यंदा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा बोलबाला असण्याची शक्यता आहे. तसेच लिलावासाठी एकूण 1 हजार 166 खेळाडूंनी नोंदणी केली असून जोफ्रा आर्चर मात्र या लिलावाच्या यादीतून गायब आहे.
मुंबई इंडियन्सने मोठी किंमत मोजून आर्चरला संघात सहभागी करून घेतले होते, मात्र आर्चरने मुंबईची निराशा केली. त्यामुळे यंदाच्या मोसमासाठी आर्चरला मुंबईने रिलीज केले होते. त्यामुळे दुबई येथे होणाऱ्या लिलावात आर्चरला कोणता संघ किती किंमत मोजून विकत घेतो याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. मात्र आर्चरने यंदाच्या आयपीएल लिलावासाठी नाव नोंदणी केली नसल्याने सर्वांनाच धक्का बसला.