
सामना ऑनलाईन । मुंबई
‘राममंदिराच्या मुद्द्यावर झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आयोध्येनंतर आता पंढरपूरला जाणार आहे. इतकेच नाही तर वेळ पडल्यास राज्याबाहेरही जाणार, असे सूचक संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
सत्ता अल्ल्यानंतरही गेली साडेचार वर्षं हा कुंभकर्ण झोपला आहे. कुणी त्यावर बोलण्यास तयार नाही. भाजपला तर राममंदिरच्या मुद्द्यावर आता मते मागण्याचा अधिकार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कोर्टाकडे बोट दाखवून चालणार नाही हा मुद्दा आता कायदा करून सोडवावा, अशा खणखणीत शब्दात त्यांनी आपली मागणी लावून धरली. हिंदूंच्या भावनांशी चाललेला हा खेळ थांबवावा म्हणून आपण बोलत आहोत. हिंदूंच्या भावनांशी सुरू असलेला खेळ आणि दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात 24 डिसेंबर रोजी पंढरपुरात सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात भीषण दुष्काळ हातपाय पसरतो आहे. त्याच संदर्भात आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. दुष्काळग्रस्त भागात कशी कामे सुरू आहेत याचा आढावा या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की जो दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शिवसेनेची कामे सुरू झाली आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
- 24 डिसेंबर रोजी पंढरपुरात सभा घेणार
- कुंभकर्णाला जागं करण्यासाठी पंढरपुरात सभा घेणार
- म्हणून अयोध्येत जाऊन सभा घेतली
- चार वर्ष झाली तरी कुणी राममंदिरावर बोलायला तयार नाही
- अशी कामं करणारा, दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभा राहणारा शिवसेना एकमेव पक्ष आहे
- शिवसेना पहिल्यापासून दुष्काळग्रस्तांसाठी काम करत आली आहे
- दुष्काळासंदर्भात बैठक घेतली
- उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केलं मार्गदर्शन
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे उपस्थित
- राज्याच्या कानाकोपऱ्यातील पदाधिकारी, नेते उपस्थितीत
- शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेनाभवनात महत्वाची बैठक

























































