आयफोनसाठी कर्जघोटाळा, मेलेल्या माणसाला दिलं कर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, अहमदाबाद

आयफोनसाठी दोन तरुणांनी स्वत:च्या कंपनीला फसवत कर्जघोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गुजरातमधील अहमदाबादची असून याप्रकरणी चैतन्य आणि ध्रुकेश पटेल या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे दोघेही जण टाटा फायनान्स कंपनीसाठी काम करत होते.

चैतन्य आणि ध्रुकेश या दोघांना टाटा फायनान्स कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीवर कामाला घेतलं होतं. हिमालय मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये या दोघांना मोबाईलसाठी कर्ज देण्याच्या डेस्कची जबाबदारी देण्यात आली होती. या दोघांनी आयफोनसाठी ६ महिन्यांच्या इएमआयवर ८० हजारांचे कर्ज मंजूर केले. ज्या व्यक्तीला त्यांनी हे कर्ज मंजूर केले त्याचं नाव विजय भावसार असं आहे.

कर्ज मंजूर झालं, आयफोन विकला गेला मात्र ईएमआय काही भरण्यात आले नाहीत. यामुळे टाटा फायनान्सच्या कर्ज वसुली विभागातील एक कर्मचारी भावसार यांच्या पत्त्यावर गेला. त्याने भावसार यांच्याबद्दल चौकशी केली असता भावसार कुटुंबियांनी त्यांचा २३ जानेवारी २०१७ साली मृत्यू झाल्याचं सांगितलं. यामुळे हादरलेला कर्मचारी धावतपळत कार्यालयात पोहोचला आणि त्याने घडलेला प्रकार त्याच्या वरिष्ठांना कळवला. कंपनीची फसवणूक झाल्याचं कळताच पोलिसांत तक्रार देण्यात आली. तक्रारीच्या आधारे  चैतन्य आणि ध्रुकेश यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे ? आणि कर्जावर घेतलेला आयफोन नक्की कोण वापरतोय याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.