कर्जमाफीची प्रक्रिया सुटसुटीत असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद

cm-uddhav-thackeray

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास सुरुवात झाली असून नगर जिल्ह्यातील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. कर्जमाफीच्या प्रक्रियेत त्यांना काही अडचणी आल्या का, त्यांचा अनुभव कसा होता याची चौकशी केली. ‘मागच्या सरकारच्या कर्जमाफी योजनेमध्ये आम्हाला कर्जमाफी मध्ये बराच त्रास झाला होता. मात्र या कर्जमाफी मध्ये फक्त अंगठा द्यावा लागला, इतकी सुटसुटीत पद्धत झाली’, अशी भावना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या संवादात एका शेतकरी बांधवाने बोलून दाखवली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर पोपटराव मोकाटे, उमाकांत हापसे, राजेंद्र बनकर, या शेतकऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधून कर्जमाफी संदर्भातील माहिती दिली. दरम्यान, नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी येथील शेतकरी अशोक मोहन देशमुख यांना शेतकरी कर्जमाफीचा पहिला लाभ मिळालेला आहे.

सोमवारी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी व जखणगाव या दोन गावांची निवड करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय अहिरे, आदींच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही गावातील शेतकर्‍यांशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला.

राज्यातील तीन जिल्ह्याच्या प्रायोगिक तत्त्वावर दोन गावांची निवड करण्यात आली होती. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संवाद साधताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमची आपुलकीने चौकशी केली. शेती कशी काय सुरू आहे, यासह विविध प्रश्न त्यांनी आम्हाला विचारले. मागील वेळेला तुम्ही शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतला होता का, असेही त्यांनी आम्हाला विचारले.

cm-chat-with-farmers

मागच्या कर्जमाफीमध्ये आम्हाला अनेक बाबींचा त्रास झाला. मात्र या तुम्ही दिलेली कर्जमाफी ही अतिशय सुटसुटीत पद्धतीचे आहे. त्यामुळे आम्हाला या कर्जमाफी मध्ये कोणताही त्रास झाला नाही, अशी भावना या शेतकऱ्यांनी मांडली.

आपली प्रतिक्रिया द्या