कोपरगावात अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

मढी फाटा (ता. कोपरगाव) येथे अवैध वाळु वाहतुकीविरुध्द कारवाई करुन 5 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन, उपसा व वाहतुकी विरुध्द विशेष मोहिमेचे आयोजन करून कारवाई करण्या बाबतचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोना सचिन अडबल, पोकों रणजित जाधव, पोकों जालींदर माने, पोकी आकाश राजेंद्र काळे याचे पथक स्थापन करुन अवैध वाळू उत्खनन उपसा व वाहतुकीविरुध्द कारवाई करण्यासाठी रवाना करण्यात आले होते. हे पथक कोपरगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळु उत्खनन उपशाबाबत माहिती मिळवत होते. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना खबऱ्याकडून बातमी मिळाली की, देरडे फाटा ते कोळपेवाडी रोडने (मढी शिवार, ता. कोपरगाव) या ठिकाणी विनानंबरचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर विनापरवाना वाळूने भरून येणार आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक दोन पंचांसह सापळा रचुन थांबले होते. त्यावेळी एक विना नंबरचा ट्रॅक्टर आणि त्यामागे निळ्या रंगाची दुचाकी ट्रॉली येताना दिसली. पथकाची खात्री होताच त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर थांबविला. ट्रॅक्टर ट्रॉलीची पाहणी करता त्यामध्ये वाळू असल्याची खात्री झाल्याने चालकास वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली. चालकाने त्याच्याकडे शासनाचा वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्याचे नाव तुषार राजेंद्र रोकडे (वय 20, रा. माहेगाव देशमुख, ता. कोपरगाव, जि. नगर) असे आहे. त्याने गणेश काटे, विकी सरोदे यांच्या सांगण्यावरुन गोदावरी नदीपात्रातुन उत्खनन करुन वाळू आणलेली असुन गणेश काटे व विकी सरोदे हे दोघे वाळू धंद्यामध्ये पार्टनर असल्याचे सांगितले. पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉलीसह एकूण 5 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.