
घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्य़ा मुंबईकरांची खऱ्य़ा अर्थाने लाईफलाईन म्हणजे मुंबईची लोकल. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये ही जीवनरेखा अक्षरशः ठप्प झाली. गेले 9 महिने सर्वसामान्य मुंबईकर लोकलच्या प्रवासापासून वंचित आहेत.
पण दिवाळीनंतरची कोरोनाची आकडेवारी आटोक्यात राहिल्याने आता सर्वसामान्यांना लोकलची दारे उघडी होण्याची चिन्हे आहेत. येत्या 11 आणि 12 डिसेंबर रोजी राज्य सरकार, महापालिका आणि रेल्वे अधिकाऱ्य़ांची महत्त्वाची बैठक होणार असून त्यात लोकल सर्वसामान्यांना खुली करण्याबाबत निर्णय होणार असून रोजीरोटीसाठी गेल्या काही महिन्यांपासून लांब रांगा लावून एसटी आणि बेस्टमधून करावा लागणारा दगदगीचा प्रवास संपणार आहे.
गेले नऊ महिने कोरोना संकटामुळे लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले आहेत. 15 जूनपासून अत्यावश्यक कर्मचाऱ्य़ांसाठी लोकलचा मर्यादित फेऱ्य़ांच्या स्वरूपात प्रवास सुरू करण्यात आला.
आता तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या नव्वद टक्के फेऱ्य़ा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. तरीही कोरोनाच्या दुसऱ्य़ा संभाव्य लाटेच्या भीतीमुळे सर्वसामान्यांना लोकलचा प्रवेश बंदच ठेवण्यात आला आहे.
15 डिसेंबरनंतर सर्वांसाठी लोकल प्रवास खुला करण्यावर 11-12 डिसेंबरच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या बैठकीला राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी उपस्थित असणार आहेत. यात कोरोना स्थितीचा आढावा घेऊन लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबई आणि परिसरातील कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्य़ा वकील आणि त्यांच्या नोंदणीकृत क्लार्कना लोकल प्रवासाच्या दिलेल्या मुभेला राज्य सरकारच्या विनंतीवरून रेल्वेने गुरुवारी तिसऱ्य़ांदा मुदतवाढ दिली आहे.
सर्व नियम पाळूनच…
लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखणे, सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक असेल. सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेले मुंबईकर आता परतू लागले आहेत. परिणामी सध्या नियंत्रणात असलेला कोरोना पुन्हा वाढू नये यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. दिवाळीनंतरच्या आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कितपत वाढ होत आहे. त्यावर मुंबई लोकल सुरू करण्याचा कोणताही निर्णय अवलंबून असणार आहे.


























































