
नौकऱ्यांमध्ये भुमीपुत्रांना शंभर टक्के प्राधान्य देण्याबाबत इतर राज्यांत लागू असलेला कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा यासाठी आपण मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मंत्रीमंडळात पाठपुरावा करणार असून तरूणांनी आपल्याच भागात रोजगार मिळावा याकरिता भुमीपुत्र प्राधान्य कायद्यासाठी रेटा वाढवावा, असे आवाहन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.
राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य नौकरी महोत्सवात रविवारी 8 सप्टेंबर रोजी जिल्ह्याभरातील तरूणाईचा जनसागर ऊसळला. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. खोतकर पुढे म्हणाले की, तरूणांना मार्ग मिळावा या शोधात आपण सातत्याने असतो यातूनच नौकरी महोत्सवाचे आयोजन केले. गतवेळी घेतलेल्या महोत्सवात काही तरूणींना राष्ट्रीय कृत बँक, हवाई सुंदरी, क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे पुन्हा नौकरी महोत्सव घेण्याची ऊर्जा मिळाली. असे त्यांनी नमूद केले. यंदा 67 राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांना निमंत्रित केले. पैकी 40 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. कंपन्यांना शासन व स्वत: मदत करू असे सांगून येथील उमेदवारांची गुणवत्ता व पात्रतेनुसार निवड करावी. तसेच मापदंडात बसवून पात्र उमेदवारांच्या याद्या तयार करून प्रसिद्ध कराव्यात अशा सुचना, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर अंबेकर म्हणाले बेरोजगारी हा देशासमोर सर्वात ज्वलंत प्रश्न असून रोजगार नसल्याने अनेक तरूणांचे विवाह रखडले. राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या रूपाने तरूणांना रोजगार देणारे नेतृत्व मिळाले असून त्यांनी अनेकांचे संसार जोडण्यासाठी पुढाकार घेतला. असे सांगून नैराश्य न ठेवता सातत्याने प्रयत्न करा असा सल्ला अंबेकर यांनी दिला. प्रास्ताविकात उद्योजक संजय खोतकर यांनी आयोजना मागील भुमिका विषद केली. या महोत्सवात जालना शहरासह जिल्हा व पर जिल्ह्यातील तरूणांनी सहभाग नोंदवला. एकूण 7 हजार युवक व युवती सहभागी झाले.
महोत्सवात सहभागी झालेल्या उमेदवारांनी मुलाखती दिल्या नंतर पात्रतेनुसार 1471 उमेदवारांची निवड होऊन निवडीचे पत्र देण्यात आले. तसेच रात्री उशीरापर्यंत निवडीची प्रक्रीया सुरू असून आणखी उमेदवारांची निवड होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

































































