लोकलमध्ये चोर्‍या करणारी बंगाली टोळी गजाआड 

389

गर्दीच्या वेळेस प्रवाशांना हेरून चोर्‍या करणार्‍या बंगाली टोळीला बोरिवली रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हैदरअली जाकीरअली आखान, सजन ऊर्फ अयानल जावेदअली लस्कर आणि राहुल ओमर फारुख लस्कर अशी या तिघांची नावे आहेत.

मुंबईच्या तिन्ही मार्गांवर साधारण दिवसाला 60-70 चोरी, पाकिटमारी असे विविध गुन्हे दाखल होतात. खासकरून गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हात की सफाई करतात. अशा चोरट्यांविरोधात बोरिवली रेल्वे पोलिसांनी मोहीम हाती घेतली. लोकलमध्ये चोर्‍या करणारी एक बंगाली टोळी सक्रिय झाल्याची खबर पोलिसांना मिळाली. सहायक आयुक्त सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भास्कर पवार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन इंगवले, इरफान नदाफ यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी हैदरला बोरिवली स्थानकातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत सजन आणि राहुलचे नाव समोर आले. पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. या तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले होते. या टोळीतील एक महिला फरारीं असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. ही टोळी बंगालहून मुंबईला येते. मुंबईत आल्यावर ही टोळी रेल्वे स्थानक, बसस्टॉप येथे राहते. चोर्‍या केल्यावर ते पुन्हा बंगालला जातात.

अशी करतात चोरी 

ज्या प्रवाशाच्या गळ्यात सोने आहे त्याला टार्गेट करतात. या टोळीतील एकजण त्याच्यासोबत किरकोळ वाद घालतो. त्यानंतर सजन आणि राहुल हे मध्यस्थीचे नाटक करतात. प्रवाशाचे लक्ष विचलित झाल्यावर हैदर हा प्रवाशाची सोनसाखळी चोरतो. ती सोनसाखळी फरार महिलेकडे देतात.

आपली प्रतिक्रिया द्या