दहशत पसरविणाऱ्या गुंडाविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील मंगळवार पेठेत दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. परेश उदय मेहता (22, रा. लक्ष्मीनारायण सोसायटी, मंगळवार पेठ) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यानुसार केलेली ही 21वी कारवाई आहे.

आरोपी परेश मेहता याने साथीदारांसह फरासखाना आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, रॉड, सुरा यासारख्या हत्याराने खुन, दुखापत, दंगा, बेकायदेशीरपणे हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. मागील 6 वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध 5 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली होती.

त्याचा भितीमुळे नागरिक तक्रार करण्यास धजावत नव्हते. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला. त्यानुसार आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या 8 महिन्यांत शहरात दहशत निर्माण करणाऱ्या 21 अट्टल गुन्हेगारांना स्थानबद्ध करून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.