बागेत बसलेल्या जोडप्याला संस्कृतीरक्षक म्हणवणाऱ्यांची मारहाण, सत्य कळताच कार्यकर्त्यांना जमावाने चोपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fight
file photo

14 फेब्रुवारी रोजी हरयाणातील काही कथित संस्कृती रक्षकांनी विविध बागांची पाहणी केली. यावेळी त्यांना जी जोडपी दिसली त्यांना या कथित संस्कृतीरक्षकांनी दमदाटी केली आणि काहींना मारहाणही केली. मात्र एका ठिकाणी या कथित संस्कृतीरक्षकांना स्वत:च मार खावा लागला. गही घटना फरिदाबादेत घडली आहे. फरिदाबादेत बजरंग दलाच्या कथित कार्यकर्त्यांनी बागेतील एका जोडप्याला मारहाण केली. मात्र थोडावेळाने या कार्यकर्त्यांचीच स्थानिकांनी धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळे ही बाब लोकांच्या लक्षात आली आहे.

फरीदाबादेतील एका बागेमध्ये एक जोडपं गप्पा मारत बसलं होतं. तिथे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी या जोडप्याला घेरून दमदाटी करण्यास सुरुवात केली. थोडावेळाने या जोडप्याला या कार्यकर्त्यांनी मारहाणही केली. या कार्यकर्त्यांनी आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं होतं. हे जोडपं या कार्यकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतं की आम्ही प्रेमी युगुल नसून आम्ही पती-पत्नी आहोत. मात्र तरीही त्यांना मारहाण करण्यात आली. एका जोडप्याला मारहाण होत असल्याचे पाहून तिथे गर्दी जमली. लोकांच्या जेव्हा लक्षात आलं की हे जोडपं विवाहीत आहे, तेव्हा त्यांनी या कार्यकर्त्यांनाच चोपायला सुरुवात केली. आपण गडबड केली असून आता आपण जाम मार खाणार याची खात्री पटल्याने हे कार्यकर्ते पळून जायला लागले होते, मात्र स्थानिकांनी त्यांना पकडून लाथा-बुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण केली.