महामारीच्या काळात गारपिटीचा फटका, गारपीट झालेल्या भागाचे पंचनामे सुरू

355

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात रविवारी झालेल्या अवकाळी गारपिटीसह पावसामुळे आंबा, मोसंबी, डाळिंबे व कांदा आदी फळपिकांचे अतोनात नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. कोरोना महामारीमुळे अडचणीत आलेला शेतकरी वादळी पावसामुळे दुहेरी अडचणीत सापडला असून हातात येणारे उत्पन्न बुडाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे,वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मावेजा देण्याची मागणी समोर आली असून कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. बदनापूर तालुक्यात रविवारी दुपारी 3 नंतर जोरदार वाऱ्यासह गारपीट व वादळी पाऊस पडल्यामुळे प्रचंड प्रमाणात फळपिकांचे नुकसान झाले होते.

तालुक्यातील खरबूज, टरबूज, आंबा, मोसंबी, कांदा बी, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वसाधारणपणे शेतकरी नैसर्गिक असमतोल वातावरणामुळे पंतप्रधान विमा योजनेतंर्गत विमा भरतात. त्यामुळे आपत्कालिन परिस्थितीत झालेले नुकसान विमा कंपनी शेतकऱ्यांना देत असते. त्या अनुषंगाने तालुक्यातील मोसंबी, अंबा आदी उत्पादकांनी फळविमा घेतला होता. परंतु तालुक्यात केळी पिक हे निकषात बसत नसल्यामुळे केळी हे पीक फळपिक विमा भरता आला नव्हता. बदनापूर तालुक्यात वातावरण पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल मोसंबी, डाळिंबे, आंबा, कांदा बी या फळपिकाकडे जास्त आहे तर केळी पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा कमी असून तालुक्यातील गोकूळवाडी, कडेगाव येथील शेतकऱ्यांनी केळी लागवड केलेली आहे. कोरोना महामारीमुळे सर्व मार्केट बंद झाल्याने फळपिके शेतकरी बाजारात घेऊन जाऊ शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच रविवारी तालुक्यात तब्बल अर्धा तास गारपीठ सह वादळी पाऊस झाला त्यामुळे फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे आली आहे. दरम्यान रविवार पडलेल्या जोरदार वादळामुळे व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आ. नारायण कुचे, तहसीलदार संतोष बनकर, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी गोकूळवाडी, सोमठाणा, कंडारी, मालेवाडी आदी ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन केली या वेळी गळ झालेल्या बागा, जोरदार वाऱ्यामुळे पडलेले झाडे व पडझड झालेली घरे व उडालेल्या पत्रांमुळे रविवारी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या