
कोरोनाच्या नियमांमुळे आयुष्यात एकदाच होणारे लग्न अविस्मरणीय करण्यासाठी एका जोडप्याने शक्कल लढवली. लग्नाची हौस पूर्ण करण्यासाठी या जोडप्याने चक्क विमानात लगीनगाठ बांधली. एवढेच नाही तर वधू-वरांसह 130 वऱ्हाड्यांनी आकाशात झेप घेतली आहे. देशभरात या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोरोनाचे संक्रमण असल्याने लग्नसमारोहांवर निर्बंध आले आहेत. 25 जणांमध्येच लग्न करण्याची परवानगी आहे, 25 जणांमध्ये नेमके कोणाला बोलवायचे आणि कोणाला नाही याचा पेच पडत आहे, अशावेळी राकेश आणि दीक्षा या जोडप्याने आपले लग्न नातेवाईकांसोबत विमानात करण्याची भन्नाट शक्कल लढवली. हे आगळेवेगळे लग्न तामिळनाडूच्या मदुराई येथे झालं आहे. तामिळनाडूमध्ये कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता तिथले मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी 24 आणि 31 मे लॉकडाऊन जाहीर केलं. या दरम्यान लग्न करण्याची योजना आखलेल्या अनेक जोडप्यांनी मंदिराबाहेर जमून आपल्या नातेवाईकांसमोर लग्न केलं. मात्र या दोघांना आपलं लग्न अनोख्या पद्धतीने करायचे होतं याच कारणानं राकेश आणि दीक्षाने 2 तासांसाठी एक स्पाइसजेटचं एक चार्टर्ड विमान भाड्यानं घेतलं होतं. खरंतर या जोडप्याचे दोन दिवसांपूर्वी लग्न झालं होते. मात्र फार कमी जणांमध्ये त्यांनी ते लग्न उरकल होतं.
लॉकडाऊन होण्यापूर्वी 23 मे रोजी एका दिवसाची सूट देण्यात आली होती. त्याची संधी साधत लॉकडाऊनआधीच आपले लग्न अविस्मरणीय करण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली. विमानामध्ये त्यांनी बंगळुरू ते मदुराई आणि पुन्हा मदुराई ते बंगळुरू असा प्रवास केला होता. या दाम्पत्याने दावा केला होता की विमानात आलेल्या 130 नातेवाईकांनी आरटीपीसीआर टेस्ट केली होती आणि रिपोर्ट निगेटिव्ह आले होते आणि त्याबाबत माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली होती.
तामिळनाडूमध्ये सरासरी पस्तीस हजारांपेक्षा जास्त संक्रमणाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कडक बंधने घालून आणखी एक आठवडा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला.





























































