
नरंदे परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात जरबेरा फुलांचे उत्पादन करतो. ग्रीन हाउस मध्ये जरबेरा फुलांसह डच गुलाब, झेंडूची फुले, निशिगंध, गलाटा यांसारख्या अनेक प्रकारच्या फुलांचे उत्पादन येथील शेतकरी घेत असतो.
गेला महिनाभर कोरोना विषाणूमुळे देशभऱात लॉकडाऊन केला आहे. त्यामुळे पुणे, मुंबई सह परराज्यातील वाहतूक ठप्प झाली आहे . तर बाजारपेठा बंद आहेत . त्यामुळे ग्रीन हाऊस मधील फुलांची मागणी फारच कमी झालीआहे. तसेच एप्रिल, मे या महिन्यामध्ये विवाह, साखरपुडा, मुंज, वास्तुशांती यांसारख्या कार्यक्रमांना या फुलांची मागणी मोठी असते पण लॅाक डाऊन मुळे ही मागणी बंद झालेली आहे. देशांतर्गत तसेच परदेशात फुलांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते पण कोरोना विषाणूमुळे फुलांची मागणी होत नाही.
ऑगस्टमधील महापुराने विस्कळीत झालेली बाजारपेठ परत एक महिनाभर व इथून पुढे एक ते दोन महिने फुलांना मागणी नाही. पण फुलांचा खर्चही न परवडण्यासारखा आहे. या फुलांवर मारण्यात येणारी औषधे अत्यंत महाग असून फुलांची काढणी, पॅकेजिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूरही लागतात. कोरोनाच्या लॅाक डाऊनमुळे ही मागणी व कामगारांच्या हातचे कामही ठप्प झाले आहे.
फुलांना मागणी व दरही कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी ग्रीन हाऊस मधील फुले काढून टाकली आहेत त्याचप्रमाणे झाडांना आलेल्या कळ्याहि खुडून टाकलेल्या आहेत. पाच ते सहा महिन्यापूर्वी आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आता यात कोरोनोच्या साथीने आणखीनच भर टाकलेली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्था सोसायट्या यांमधून कर्जाची उचल केलेली आहे; पण अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना फायदा न होता तोटाच अधिक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेल्या कर्जाचा हप्ता कसा फेडावा अशी चिंता त्यांना लागलेली आहे .



























































