साहित्यकट्टा – ग्लोबल काव्यहोत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सुरक्षित राहा, घरात राहा आणि संपर्कात राहा’ हे ब्रीदवाक्य घेऊन मनसा क्रिएशन्सतर्फे या ग्लोबल वेब कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी साहित्यसृष्टीतील तमाम कवी-कवयित्रींनी आपल्या ‘काव्यसमिधा’ या काव्यहोत्रात अर्पण करून हा ‘काव्यमाला काव्यहोत्र’ उपक्रम सातासमुद्रापार नेला आहे.

कोरोना नामक विषाणूने सर्व जगाचं जगणं एका वेगळय़ा नियमात बांधलं. मार्चच्या अखेरीस हिंदुस्थाननेही लॉकडाऊन जाहीर केले. हे लॉकडाऊनचे नियम पाळत आपण सगळे उंबरठय़ाच्या आत बंदिस्त झालो. सगळं जगच जणू ठप्प झालं होतं. पण केवळ या कारणामुळेच कधी नव्हे तो इतका वेळ आपल्याला मिळाला होता. सर्जनशील मन अशा मनोमनी संवादाच्या शोधात असतंच. ही वेळ अशा संवादासाठी जोडायची हे ठरवतच कालिका बापट यांनी ‘काव्यहोत्र काव्यमाला’ ही काव्य गुंफणारी संकल्पना फेसबुकद्वारे सादर केली आणि या संकल्पनेला तुफान प्रतिसाद लाभला.

काव्यहोत्र उपक्रमाची सुरुवात झाली पुस्तक दिनादिवशी अर्थात 23 एप्रिल रोजी. एकाने कविता सादर करायची आणि त्याने दोन कवींची नावे सुचवून हा उपक्रम पुढे न्यायचा असा हा उपक्रम होता. यासाठी कवी, कवयित्रींना पाठविण्यासाठी निमंत्रण संदेश बनविण्यात आले. मनसा क्रिएशन्सच्या कालिका बापट यांनी हा उपक्रम गोव्यातून सुरू केला असला तरी सीमांचं बंधन नव्हतंच. आता हा उपक्रम सातासमुद्रापार गेला आहे. गोवा, महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र, बृहन्भारत, आणि विदेशातील हजारो कवी-कवयित्री या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. दिवसेंदिवस या उपक्रमाची व्याप्ती वाढत असून, दिवसाकाठी पंचवीस ते तीस कवी-कवयित्री यात स्वतःचे कविता सादरीकरणाचे व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करीत आहेत.
उपक्रम सुरू होण्याच्या प्रवासाबाबत कालिका उत्साहाने सांगतात, ‘‘या उपक्रमात सर्वांना जोडून घेऊन ही काव्यदिंडी पुढे न्यायची आहे एवढंच माहीत होतं. 23 एप्रिल रोजी या उपक्रमासंदर्भातील व्हिडीओ तयार केल्यावर 24 तारखेला सकाळी 4 वाजता मी तो व्हिडीओ फेसबुक पेजवर अपलोड केला. गोव्यातील सर्वच प्रथितयश कवी, कवयित्रींना मी संदेश पाठवून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. या उपक्रमाची नांदी केली ती माझी युवा मैत्रीण निशा नागराज गोरे हिने. त्यानंतर नामवंत कवयित्री ऍड. केतकी साळकर, प्रा. डॉ. नीता तोरणे, गोव्याचे गझलकार दत्तप्रसाद जोग यांनी व्हिडीओ टाकत उपकरणाची छान सुरुवात झाली. काव्यहोत्रने जोर धरला.

या उपक्रमात महाराष्ट्रातील प्रथितयश कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला आहे. ज्येष्ठ साहित्यिक महेश केळूसकर, ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख, गझलकार प्रशांत वैद्य, गझलकार आनंद पेंढारकर, महेश देशपांडे, ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, आश्लेषा महाजन, स्वरूपा सावंत, वैशाली मोहिते, अनिल आठल्ये इत्यादी अनेक कवी-कवयित्रींनी यात सहभाग घेतला आहे. 23 एप्रिल रोजी आखलेला हा उपक्रम लवकरच सातासमुद्रापार पोचला. अमेरिकास्थित ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री वर्षा सातपुते हळबे, सिंगापूरच्या संचिता कारखानीस, मोहना कारखानीस, सुचेता चौगुले-पाटील, अबुधाबीच्या रूपाली कीर्तनी, पीनल चौधरी अशा कितीतरी जणींनी या काव्यहोत्रात सहभाग घेतला आहे. सामाजिक संदेश घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमाला सर्व स्तरांवरून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

काव्यहोत्र साकार होताना कालिका यांना वेगवेगळे अनुभव आले. सगळेच चांगलं आणि ऊर्जा देणारे अनुभव गाठीशी आल्याने उत्साह वाढला. हे सांगताना त्यांनी एका घटनेचा आवर्जून उल्लेख केला. या उपक्रमात उसगाव गोव्याहून एका सत्तरी ओलांडलेल्या सुरेखा देसाई या आजींनी सहभागी होण्याची इच्छा दर्शविली. परंतु त्यांचे स्वतःचे फेसबुक अकाउंट नसल्याने त्यांच्या मुलाच्या मदतीने त्यांनी कविता सादर केली. यामुळेच कविता सगळय़ांना जोडणारी असते. तिथे काहीच अधिकउणं नसतं याची प्रचीती आली असं कालिका आवर्जून सांगतात.

काव्यहोत्रच्या या प्रवासात अनेक वळणं आली. यातीलच एक म्हणजे गझलकार स्वरूपा सामंत यांनी या काव्यहोत्रात सहभाग घेतला. ‘पार्कातल्या कविता’च्या संस्थापक असलेल्या स्वरूपा सामंत यांनी आपली कविता सादर केल्यावर फक्त दोनच नव्हे, तर अनेकांची नावे सुचवली. यात गझलकार आनंद पेंढारकर, निर्मिती कोल्हे, महेश देशपांडे इत्यादी अनेकांची नावे सुचवली. या कवी-कवयित्रींनी ही काव्यदिंडी जोमाने पुढे नेली. या काव्यहोत्रात ग. दि. माडगूळकर यांची नात लीनता माडगूळकर-आंबेकर यांनीही सहभाग घेतला.

कालिका यांच्या या उपक्रमाची मान्यवरांनीही दखल घेतली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी तथा गोवा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत यांनीही आपल्याला भावलेली मराठी कविता सादर केली. तसेच गोव्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनीही सर्व सहभागी कवी-कवयित्रींना शुभेच्छा देऊन स्व. विष्णू वाघ यांची ‘घूमचे कटर घूम’ ही कविता सादर केली. महाराष्ट्र पोलिसांनी वर्दीत आपल्या कविता सादर करून या उपक्रमाचा संदेश सर्वांपर्यंत पोचविला. मुंबईचे ज्येष्ठ पोलीस नंदू सावंत ज्यांनी आपली फौजच या काव्यहोत्रात आणली आहे.

कोरोनाच्या या वैश्विक संकटात सर्वांनी एकत्र येऊन आपल्या प्रतिभेच्या माध्यमातून समाजात सकारात्मकतेची ज्योत सदैव तेवत ठेवावी, हाच कालिका बापट यांच्या काव्यहोत्र संकल्पनेचा उद्देश होता आणि आहे. ही सकारात्मकता निश्चितच सार्थ ठरणारी आहे.