बेस्टच झाले! अडीअडचणीत सेकंड लाईफ लाईन उपयोगी आली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनलॉकचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होताच मुंबईकर चाकरमान्यांनी बेस्ट, एसटी, खाजगी वाहतूक सेवा अशा सर्वच सुविधांवर ‘सोशल डिस्टन्सिंग’चे सारे नियम तोडून मोडून गर्दी केली. आवठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामाला जाण्यासाठी मुंबईची बेस्ट चाकरमान्यांसाठी अक्षरश: तारणहार ठरली. विरार ते डोंबिवलीपासून बेस्टच्या बसेना रांगा लागल्या आणि काही ठिकाणी ‘सोशल डिस्टन्सिंग’ गर्दीमुळे पाळता आले नाही. त्यामुळे बेस्टने गर्दीपाहून जादा बसेस रस्त्यावर उतरविल्या आणि अडलेल्यांना मुंबईकरांच्या मदतीला धावण्याचा आपला बाणा कायम राखला.

आजपासून खाजगी आणि सरकारी कार्यालयांना ठराविक कामगार संख्या राखून सुरूवात करण्यास हिरवा झेंडा मिळाल्याने बेस्ट आणि एसटीने आपली सुविधा सर्वसामान्य प्रवाशांसाठीही सुरू केली. बृहन्मुंबईच्या सीमेपलिकडेपासून अगदील विरार, बदलापूर ते पनवेलपर्यंत पहाटेपासून बेस्ट आणि एसटी बसेसने आपल्या फेर्‍या सुरू केल्या. सकाळी आठ वाजता 1778 बसेस बाहेर पडल्या. त्यानंतर बसेस वाढविण्यात आल्या. दहा वाजताच्या सुमारास बेस्टने 2132 बसेस चालविल्या. 1992 कंडक्टर आणि 2024 ड्रायव्हर 118 निरीक्षक अशाप्रमाणे बेस्ट कामगारांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला होता अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी दिली.

पुन्हा बेस्टच ठरली तारणहार…

उपनगरीय लोकल बंद असल्याने अनलॉक मिशनच्या तिसर्‍या टप्प्यासाठी बेस्टने सोडलेल्या बसेना सकाळपासून तूफान गर्दी झाली. प्रवाशांनी बसेसना प्रचंड रांगा लावल्या. सकाळी लवकर पहिल्या पाळीला जाणार्‍या चाकरमान्यांनी ‘एमएमआर रिजन’मध्ये मोठ्या रांगा लावत प्रवास सुरू केला. या बसेसची गर्दीपाहून त्यानंतर चाकरमान्यांनी मिळेल खाजगी वाहनाने रस्ते मार्गे प्रवास करण्याचा निणर्य घेतला. त्यामुळे रस्ते मार्गावरही वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची वाहतूक कोंडी झाली.

लोकल, काळी-पिवळी टॅक्सी बंदच!

उपनगरीय रेल्वे आणि टॅक्सी सेवा बंद असल्याने सर्व प्रवाशांनी बेस्ट आणि एसटीच्या बसेसना रांगा लावल्या. त्यामुळे बेस्ट आणि एसटी अखेर अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांची पुन्हा तारणहार ठरली आहे. एसटी महामंड‌ळाने अडीचशेहून अधिक गाड्या सोडल्या. सरकारने काळ्या-पिवळ्या टॅक्सींना केवळ रेल्वे टर्मिनस, एअरपोर्ट व हॉस्पिटल अशा अत्यावश्यक सेवांसाठीच सशर्त परवानगी दिली असल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष ए.एल.क्वॉड्रोज यांनी सांगितले.

30 हजार फेर्‍यांद्वारे मुंबईकरांना मदत

सोमवारी बेस्टने रेग्युलर मार्गावर 1800 बसेस चालविल्या. आतापर्र्यत लॉकडाऊन काळात 600 डेडीकेटेड (अत्यावश्यक सेवा) बसेस सुरू होत्या. त्याच्यात अडीच ते तीनशे बसेस आज वाढविण्यात आल्या. या अत्यावश्यक बसेसमध्ये अडीचशे बसेस वाढविण्यात आल्या. एकूण 81 रूट 2200 बसेस धावल्या. बृहन्मुंबई हद्दीच्या बाहेर पाच जलद बस मार्गावर 900 बसेसद्वारे तब्ब्ल 30 हजार फेर्‍या चालविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकलचे प्रवासीही आल्याने गर्दी आवाक्याबाहेर

बेस्ट प्रशासनाने संपूर्ण क्षमतेने बसेस रस्त्यावर उतरविल्या नाहीत. कारण त्या चालवायला कर्मचारीच उपलब्ध नाहीत. बेस्टमध्ये अनेकांना कोरोना झाल्याने तसेच शहरात अनेक ठिकाणी ‘कन्टेन्टमेंट झोन’ असल्याने कर्मचारी कामावर पोहचू शकत नाहीत. रेल्वे बंद असल्याने तिचे सारे प्रवासी बेस्टना रांगा लावून उभे राहिले. रेल्वेची गर्दी आणि बेस्टचे नेहमीचे प्रवासी असा दुप्पट गर्दीचा भार बेस्टवर आल्याने परिस्थिती आवाक्याबाहेर गेली. बेस्ट प्रशासनाने आधी लोकांपुढे जाऊन नीट जनप्रबोधन करण्याची गरज होती. त्यानंतरच नियोजनबद्धरीतीने तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेऊनच बसेस चालू करण्याची गरज होती असे बेस्टचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितले.