
सामना ऑनलाईन, भिवंडी
भिवंडीत मुस्लिम तसेच आगरी समाजाची मते मोठय़ा प्रमाणावर असल्याने सर्वांचेचे लक्ष येथील लोकसभा निवडणुकीकडे लागते. संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडीतील मुस्लिम समाजाने गेली अनेक वर्षे काँग्रेसला साथ दिली पण काँग्रेसने मुस्लिमांची घोर फसवणूक केल्याने येथील मतदार शिवसेना- भाजप युतीकडे वळला. सध्या कपिल पाटील हे भाजपचे विद्यमान खासदार असून 1 लाख 9 हजार 450 मतांनी ते 2014 च्या निवडणुकीत विजयी झाले होते.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या वेळी 16 लाख 96 हजार 219 एवढे मतदार होते. आता ही संख्या 18 लाखांच्याही पुढे गेली आहे. नवमतदार वाढल्याने तो कोणाच्या बाजूने मतदान करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या मतदारसंघात एकेकाळी येथे काँगेसचीच हुकमत चालायची, मात्र आता काळ बदलला आहे. 2014 मध्ये विश्वनाथ पाटील यांनी काँगेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली पण त्यांचा दारुण पराभव झाला. पाच वर्षांच्या काळात काँग्रेसला पक्षसंघटनही वाढवता आले नाही. त्यामुळे काँगेसचे जुने स्थानिक नेते सुरेश टावरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता असून त्यांना काँग्रेसमधूनच अंतर्गत विरोध आहे.































































