
सामना ऑनलाईन, मुंबई
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. शिवसेना-भाजप युतीच्या शिलेदारांनी सोमवारी वाजतगाजत अपूर्व उत्साहात अर्ज दाखल केले. शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, ओमराजे निंबाळकर यांच्यासह भाजपचे नितीन गडकरी, हंसराज अहिर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदार संघांत 248 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यापैकी किती जण माघार घेतात त्यावरच लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचंड जल्लोषात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपले अर्ज दाखल केले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वतः अमरावती, यवतमाळ-वाशीम येथे उपस्थित राहत उमेदवारांचा उत्साह वाढवला. अमरावतीतून आनंदराव अडसूळ, यवतमाळ-वाशीममधून भावना गवळी यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. या वेळी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, पालक मंत्री प्रवीण पोटे हे सुद्धा उपस्थित होते.

त्याचबरोबर बुलढाण्यातून प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्री गुलाबराव पाटील, नितीन बानगुडे-पाटील यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. रामटेकमधून कृपाल तुमाने तर धाराशीवमधून ओमराजे निंबाळकर यांनी अर्ज दाखल केले. त्याचबरोबर बीडमधून भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे तसेच नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर यांनीही अर्ज दाखल केला.
पहिल्या टप्प्यातील लढती
- पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिररोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम या सात मतदार संघांत 11 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.
- वर्ध्यातून भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस यांच्यात थेट लढत होणार आहे. वर्ध्यात 23 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
- रामटेकमधून शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने आणि काँग्रेसचे किशोर गजभिये यांच्यात लढत होणार आहे. या ठिकाणी 24 उमेदवार रिंगणात आहेत.
- नागपुरात भाजपचे हेविवेट उमेदवार नितीन गडकरी यांच्याशी भाजपमधूनच बाहेर पडून काँग्रेसवासी झालेले नाना पटोले हे लढत देणार आहेत. इथे 48 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

- भंडारा-गोंदियामधून भाजपचे सुनील मेंढे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे उभे ठाकले असून या ठिकाणी तब्बल 52 उमेदवार रिंगणात आहेत.
- गडचिरोली-चिमूर मतदार संघातून भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव उसेंडी अशी थेट लढत होणार आहे. या ठिकाणी 10 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
- चंद्रपूरमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसचे ऐन वेळी उमेदवारी मिळालेले सुरेश धानोरकर यांच्यात थेट लढत असून 31 उमेदवार रिंगणात आहेत.
- यवतमाळ-वाशीममध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात थेट लढत होणार आहे. या ठिकाणी तब्बल 51 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
- अमरावती मतदार संघातून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे खास उपस्थित होते.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे नितीन गडकरी आणि रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे.
- 11 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 28 मार्च तर 18 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 29 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.
अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांचे अर्ज दाखल
दुसऱ्या टप्प्यासाठी 18 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या 10 मतदारसंघांसाठीही अर्ज दाखल झाले. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड मतदारसंघातून अखेर उमेदवारी अर्ज दाखल केला. अशोक चव्हाण स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यांनी पत्नी अमिता चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसकडून त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले. अमिता चव्हाण यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रमाणे अकोल्यामधून भाजपचे खासदार संजय धोत्रे, सोलापूरमधून काँग्रेसमधून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या पत्नी प्राध्यापक अंजली आंबेडकर यांनीही अर्ज दाखल केला आहे. लातूरमधून भाजपचे सुधाकर शृंगारे, धाराशीवमधून राणा जगजित सिंह, बीडमधून भाजपच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे, बुलढाण्यातून राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे, हिंगोलीतून काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांनी उमेदवारी दाखल केली.

































































