काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांचा एक पाय तुरुंगात असल्याचे विसरू नये; उद्धव ठाकरेंचा घणाघात

uddhav-thackrey-in-hingoli

सामना प्रतिनिधी । देवरूख

‘साठ वर्षे खाऊन ज्यांची पोटं भरली नाहीत त्यांनी या देशावर केवळ दरोडे टाकण्याचे काम केले. अनेक घोटाळे केले. घोटाळ्यांची बाराखडी देखिल कमी पडेल. स्वतः दरोडेखोर आणि दुसर्‍याला चोर म्हणणार्‍यांचा एक पाय तुरुंगात आहे हे त्यांनी विसरू नये’, असा खणखणीत इशारा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर घणाघाती टीका केली.

महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ देवरूखातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील भव्य पटांगणावर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य सभा पार पडली. सभेला व्यासपीठावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, खासदार विनायक राऊत, पालकंत्री रवींद्र वायकर, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, आमदार सदानंद चव्हाण, आमदार राजन साळवी, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जि. प. अध्यक्ष स्वरूपा साळवी, देवरूख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांच्यासह शिवसेना, भाजप, आरपीआय, रासपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर पक्षप्रमुखांचे आगमन होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणा देत मैदान दणाणून सोडले. आपल्या भाषणाची सुरवात करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, काम करणारे करतात न करणारे बोंबलतात. या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांच दुकान काढलं आहे. त्यांना ना विचार ना कृती. बापाकडे एक झेंडा, भावाकडे एक झेंडा, पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय. आम्ही कोकणाला जो शब्द दिला तो पाळला नसता तर आज हा विराट जनसमूदाय दिसला नसता. आज इथे बसायला जागा नाही. सच्चे कार्यकर्ते आज उन्हात उभे आहेत. आमच्याकडे खुर्ची साठी कोणी भुकेला नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

या वेळी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्यावीर आणि रत्नागिरीचं एक नातं होतं. सावरकर मृत्यूंजय होते. राहुल गांधी हे नालायक कारटं, यांनी सावरकरांना डरपोक म्हणावं?, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. सावरकरांना वीर नाही म्हणायचं मग काय नेभळट राहुलला वीर म्हणायचं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. यांना सावरकर कळणारच नाहीत. स्वातंत्र्यांसाठी मेहनत करणार्‍या काँग्रेसला आम्ही मानतो. आताची काँग्रेस पाहिल्यावर माना खाली जातात. सावरकरांचा अपमान करणार्‍या राहुल गांधींच नेतृत्व आजच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना मान्य आहे का? असेही ते म्हणाले.

मागीलवेळी विनायक राऊत निवडून आल्यावर कोकणवासीयांना धन्यवाद देण्यासाठी मी आलो होते. या मतदारसंघाला बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभू यांच्यासारख्या दिग्गज खासदारांची परंपरा आहे. 2009 ला ती खंडीत झाली मात्र इथल्या शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांनी ती कसर मागीलवेळी भरून काढली. याही निवडणुकीत तीच परंपरा कायम ठेवायची आहे, हा निर्धार आज प्रत्येकाने करा, असे आवाहन करताच उपस्थितांनी ‘येऊन येऊन येणार कोण विनायक राऊत यांच्याशिवाय आहेच कोण’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या.

भाजपशी युतीबद्दल बोलताना ठाकरे यांनी, भाजपशी संघर्ष हा काही तत्त्वांसाठी होता. ज्यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’वर आले तेव्हा त्यांना हीच गोष्ट आम्ही कानावर घातली. त्यांना आमची भूमिका पटली. त्यावेळीही आम्ही टोकाला गेलो नव्हतो, म्हणूनच देशहितासाठी एकत्र आल्याचे सांगत भाजप आणि शिवसेना कायम एकत्रच राहितील अशी ग्वाही त्यांनी दिली. कोकण आणि कोकणी माणूस हा शिवसेनेचा कणा आहे. मला कोणत्याही खुर्चीचा मोह नाही. धनुष्य बाण आणि कमळाला मत म्हणजे तुमचे तुम्हाला दिलेले मत. तुमच्या भविष्यासाठी, सुरक्षेसाठी हे मतदान आहे. देश सुरक्षित हातात राहायला हवा असेल तर विनायक राऊत निवडून गेले पाहिजेत. कारण आम्हाला मोदींनाच पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, इथल्या प्रचारात कुणीतरी शिक्षणाचा विषय काढतो. पण शिक्षणाबरोबर संस्कार हा भाग असतो. तू परदेशात डिग्री घेतली असशील पण संस्कार कुठे आहेत? आमचा उमेदवार तुझ्यापेक्षा कमी शिकला असेल पण तो तुझ्यापेक्षा सुसंस्कारी आणि सुशिक्षित आहे. ज्यांच्या घरात निष्ठाच नाही तो जनते बरोबर काय निष्ठावंत राहणार. यांना फक्त खुर्ची हवी त्यामुळेच हे तुमच्या समोर आलेत पण हा कोकणी माणूस यांना परत इथेच गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘आम्ही कोकणात विकासकामे केली आणि समोरचा विचारतोय काय विकास केलात. ज्याला ही विकासकामे दिसत नसतील तोच उद्याच्या निवडणुकीनंतर दिसेनासा होईल’, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

आज राज्यात अनेकजण आमच्या समोर उभे ठाकले आहेत. आम्ही युती केल्याने त्यांना असुया आली आहे. मध्यंतरी आम्ही भांडत आहोत हे बघून ते खूष होते. सत्तेवर जायचं आणि कसं खायचं हे त्यांच्याकडून शिकायचे. हे स्वतः दरोडेखोर आणि दुसर्‍यांना चोर बोलतात. यांना हे बोलायचा नैतिक अधिकारच नाही. महायुतीच्या जाहिरनाम्याबाबत बोलताना आमचा जाहिरनामा बघा आणि त्यांचा बघा. राहुल गांधी सगळीकडे फिरताहेत. वायनाडला ते लुंगी घालून फिरले आता त्यांना मंदिरे दिसली. निवडणूक आल्यावर सोनियांना होम हवन करावासा वाटला. आता त्यांना हे सुचलं? मग ते राम मंदिर बाबत का बोलत नाहीत. आमच्या जाहिरनाम्यात राम मंदिराचं आश्‍वासन आहे आणि आम्ही राम मंदिर बांधणारच असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांना दाद दिली.

पाकिस्तानला दोन वेळा त्यांच्या घरात घुसून धडा शिकवणारे मोदी हे पहिलेच हिंदुस्थानी पंतप्रधान आहेत. याचा नक्कीच अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या निवडणूकीत महाराष्ट्रात 36-40 नव्हे तर महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातुन महायुतीचे खासदार विजयी करण्याची आज शपथ घेऊया असे सांगत ठाकरे यांनी उपस्थितांना अभिवादन करीत येत्या 23 तारखेला विनायक राऊत यांना भरघोस मताधिक्क्याने निवडून द्या असे आवाहन केले.