Lok Sabha Election 2024: बारामतीतील पैसे वाटपाचा व्हिडीओ; रोहित पवारांच्या आरोपानंतर गुन्हा दाखल

बारामती लोकसभा मतदारसंघात पैसे वाटप झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला होता. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी ट्विटर हँडल वरून पैसे वाटपाचा व्हिडिओ शेअर करत पुरावाही दिला होता. त्याची दखल घेत अखेर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास बारामती शहरातील मतदान केंद्र क्र. 167 परिसरात पैसे वाटप केले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करत रोहित पवार यांनी जाब विचारला होता. ‘अजितदादा घ्या’ ईडी आणि सीबीआयने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱयांसोबत तुमच्या पदाधिकाऱयाच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ… आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका.. आणि इतर लोकं तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत, असंही म्हणू नका!’ असे या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी नमूद केले होते. या व्हायरल व्हिडिओची दखल घेत त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.